Nashik News : गोदापात्रातील तळ काँक्रिट काढण्यास सुरवात; नदीपात्रातील जैवविविधताही दृष्टीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Work in progress to remove bottom concrete from Godapatra

Nashik News : गोदापात्रातील तळ काँक्रिट काढण्यास सुरवात; नदीपात्रातील जैवविविधताही दृष्टीस

नाशिक : उच्च न्यायालयाने आदेशित करूनही गोदापात्रातील तळ काँक्रिट काढण्यास प्रशासनाची चालढकल सुरू होती, परंतु पर्यावरणप्रेमींच्या रेट्याने हे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या पात्रात फुटभरच पाणी असल्याने नदीपात्रातील जैवविविधताही दृष्टीस पडत असून विविध प्रकारचे मासे पकडण्यासाठी झुंबड उडत आहे. (Concrete removal of Godavari river Patra bottom started Biodiversity in river basin visible Nashik News)

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात गांधी तलावापासून ते टाळकुटेश्‍वर पुलापर्यंत नदीपात्राचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. परंतु, त्यामुळे नदीपात्रातील जिवंत जलस्रोत जमिनीखाली गाडले गेल्याने पात्रातील जैवविविधतेला धोका पोचल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी केला होता.

एवढेच नव्हे तर तळ काँक्रिट काढून हे जलस्रोत पुन्हा जीवित करण्याचा आग्रह त्यांनी न्यायालयाकडे धरला होता . त्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रश्‍नातील गांभीर्य ओळखत तळ काँक्रिट काढण्यासाठी महापालिका प्रशासनाला आदेशित केले होते.

त्यानंतर तळ काँक्रिट काढण्याच्या कामाला सुरवातही झाली, परंतु कालांतराने काही जणांच्या विरोधानंतर हे काम थांबविण्यात आले होते. मध्यंतरी स्मार्टसिटीच्या अधिकाऱ्यांसह या प्रश्‍नी लढा उभारणारे देवांग जानी व अन्य गोदाप्रेमींच्या बैठकीत तळ काँक्रिट काढण्याबाबत एकमत झालो होते. त्यानुसार काम सूरू झाले आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

संपूर्ण पात्र कोरडे करा : जानी

तळ काँक्रिट काढण्यापूर्वी नदीपात्रातील सर्व पाणी सोडून द्यावे व मगच कामाला सुरवात करावी, असा आग्रह श्री. जानी यांनी धरला आहे. कारण पात्रात पाणी असल्यास जिवंत पाण्याचे स्रोत पुन्हा जीवित झाल्याचे समजणार नाही, असा त्यांचा आक्षेप आहे. सकाळपर्यंत पात्र कोरडे होते, परंतु मंगळवारी (ता. २५) पुन्हा फुटभर पाणी वाहू लागले आहे.

मासे पकडण्यासाठी गर्दी

सध्या रामतीर्थाखालील सर्वच कुंडात फुटभरच पाणी आहे. या पाण्यात मोठ्या प्रमाणावर मासे सापडत आहेत. हे मासे धरण्यासाठी मोठी गर्दी उसळत आहे. यात लहान मुलांसह महिलांचाही मोठा समावेश आहे.

रामतीर्थ बारमाही प्रवाही राहावे

मकरसंक्रांतीपासून राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने शहरात येत आहेत. परंतु रामतीर्थातील पाणी स्नानायोग्य नसल्याने अनेक पर्यटक भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पात्रातील विसर्ग थांबविण्यात आल्याने सध्या गोदावरीला अक्षरश: गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. किमान रामतीर्थतरी बारमाही प्रवाही राहावे, अशी अपेक्षा पुरोहित संघासह पर्यटक भाविकांनी केली आहे.

टॅग्स :NashikGodavari River