500, 1हजारनंतर आता 5 रुपयाच्या नोटेवरही बंदी? नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

5 रुपयाच्या नोटेवर बंदी? नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम | Nashik

नाशिक : पाच वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयाची नोट चलनातून बाद केली होती. त्यासंदर्भातील अधिकृत अशी घोषणा करण्यात आली होती. पाच रुपयाच्या नोट बंदबाबत अद्याप सरकार किंवा रिझर्व्ह बँकेतर्फे कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. असे असताना सध्या बाजारातील विक्रेते पाच रुपयांची नोट घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे.

पाच रुपयाच्या नोटेवर अघोषित बंदी; विक्रेत्यांकडून टाळाटाळ

काही वर्षांपूर्वी उडालेल्या अफवेनंतर अनेक दिवस पाच रुपयांची नोट विक्रेता आणि नागरिकांकडून घेणे- देणे बंद केले होते. ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा व्यवहारात पाच रुपयाच्या नोटेचा वापर करण्यात येत होता. परंतु, काही महिन्यांपासून पुन्हा पाच रुपयाच्या नोटेबाबत विक्रेता आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बहुतांशी किरकोळ विक्रेते, व्यापारी, मोठे व्यावसायिक पाच रुपयाची नोट घेण्यास टाळाटाळ करत आहे. नागरिकांकडे असलेल्या नोटा बिनकामाच्या ठरत आहे. नक्की नोट बंद आहे की सुरू, याबाबत सर्वांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, पाच रुपयाची नोट चलनातून बाद नसल्याचे सांगण्यात आले. विक्रेता व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये जनजागृती करावी करावी, जेणेकरून सर्वांमध्ये असलेल्या शंका- कुशंका निरसन होण्यास मदत होईल. पाच रुपयांची नोट चलनातून बाद केल्याचे कुठल्याही प्रकारचे आदेश नाही. विक्रेत्यांकडून नोटा घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. जणू त्यांच्याकडून अघोषित बंदी आणली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे.

हेही वाचा: कंगणा राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

बाबा नोट नाही घेत

नागरिक बहुतांशी वेळेस किराणा दुकानांमध्ये किरकोळ सामान घेण्यासाठी मुलांना पाठवतात. अशाप्रकारे पाच रुपयाची नोट घेऊन एक लहान मुलगा दुकानात खाऊ घेण्यासाठी गेला. दुकानदाराने नोट चालत नाही, असे म्हणून खाऊ देण्यास नकार दिला. त्या मुलाने घडलेला प्रकार घरात येऊन सांगितलं. त्यातून दुकानदार आणि मुलाच्या वडिलांचा किरकोळ वाद झाला.

पाच रुपयांची नोटेबाबत प्रचंड संभ्रम आहे. विक्रेत्यांकडून नोट घेतली जात नाही. प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी. पाच रुपयाची नोट चलनातून बंद आहे किंवा नाही याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करावे. - तौफिक शेख, नागरिक

दुकानांमधून काही वस्तूंची खरेदी केल्यानंतर पाच रुपयाची नोट विक्रेत्यास दिल्यास त्याच्याकडून नोट घेण्यास नकार दिला जातो. अनेक ठिकाणी अशा प्रकारचा अनुभव आला. - अरिफ सय्यद, नागरिक

loading image
go to top