
Consumer Court : मेडिक्लेम नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक न्यायालयाचा दणका!
नाशिक : टॉन्सिलच्या ऑपरेशननंतर दि ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि.कडे हॉस्पिटलचे बिल सादर केले. परंतु कंपनीने ते नाकारल्याने त्याविरोधात मेडिक्लेमधारकाने जिल्हा ग्राहक न्यायालयाकडे (Consumer Court) धाव घेतली असता, न्यायालयाने इन्शुरन्स कंपनीचा दावा फेटाळून लावला आणि हॉस्पिटलचे बील ९ टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिले आहेत. (consumer court rejected insurance company claim ordered hospital bills to be paid with 9 percent interest nashik news)
ॲड. सुधाकर जाधव यांनी दि ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि.चा कौटुंबिक मेडिक्लेम घेतला होता. त्यांच्या मुलगा वैभव यास टॉन्सिलचा त्रास झाला. त्यामुळे त्यास गंगापूर रोडवरील निम्स हॉस्पिटलमध्ये १ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी पाच वाजता ऑपरेशनसाठी दाखल करण्यात आले.
२ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता वैभव यास हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात आले. यासाठी ॲड. जाधव यांना १७ हजार ३६४ रुपये खर्च आला. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे ॲड. जाधव यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे दाखल केले. मात्र, कंपनीने सदरचा मेडिक्लेम नाकारताना, रुग्ण हॉस्पिटलमध्ये २४ तास अडमिट नसल्याचे कारण दिले.
याबाबत ॲड. जाधव यांनी हॉस्पिटलकडे चौकशी केली असता, त्यातील समरी रिपोर्टमध्ये हॉस्पिटलकडून नजरचुकीने डिस्चार्जची वेळ २ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी २.५७ मिनिटांची लिहिली गेली. त्याबाबत हॉस्पिटलने दुरुस्ती केलेली कागदपत्रे पुन्हा विमा कंपनीकडे सादर केले. तरीही विमा कंपनीने मेडिक्लेम नाकारला होता.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
त्यामुळे ॲड. जाधव यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीविरोधात जिल्हा ग्राहक आयोगाकडे धाव घेत दावा दाखल केला.
यात सुनावणी होऊन ग्राहक न्यायालयाचे न्या. मिलिंद सोनवणे यांनी विमा कंपनीचा दावा फेटाळून लावला आणि तक्रारदार ॲड. जाधव यांना १७ हजार ३६४ रुपयांवर २१ ऑक्टोबर २०२० पासून ते प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपर्यंत दसादशे ९ टक्के व्याजाने रक्कम अदा करण्याचे आदेश विमा कंपनीला दिले.
तसेच तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रास झाल्याप्रकरणी ३ हजार रुपये व तक्रार अर्जाचा खर्च २ हजार रुपयेही अदा करण्याचे आदेश दिले आहेत. ॲड. जाधव यांनी स्वत: याप्रकरणात बाजू मांडली.