नाशिक : मुदतवाढ मिळालेल्या ‘ब’ वर्ग पतसंस्थांच्या निवडणुका जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cooperative B class credit unions Elections announced Nashik News

नाशिक : मुदतवाढ मिळालेल्या ‘ब’ वर्ग पतसंस्थांच्या निवडणुका जाहीर

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील 'ब' वर्ग सहकारी संस्थांच्या (Co-operative Societies) दोन वर्षांपासून पुढे ढकलण्यात येणाऱ्या निवडणुकीचा मुहूर्त लागला आहे. जिल्ह्यातील पतसंस्थांच्या चौथ्या, पाचव्या व सहाव्या टप्प्यातील निवडणुका (Elections) घोषित झाल्या आहेत. यात बहुचर्चित व वादळी निवडणुकीची परंपरा असलेल्या 'एनडीएसटी' सोसायटीचीही निवडणूक घोषित झाल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण तापणार आहे.

जिल्ह्यातील पतसंस्थांच्या निवडणुका कोरोनामुळे स्थगित झाल्या होत्या. सरकारी संस्था अधिनियमनुसार निवडणुका घोषित झाल्या आहेत. यात जिह्यातील 'ब' वर्ग प्राप्त पतसंस्थांचा समावेश आहे. प्रारूप मतदार यादीसाठी १ एप्रिल २०२२ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. विविध कारणांनी माध्यमिक शिक्षक पतसंस्था चर्चेत असते. सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान संचालक मंडळाला दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी मिळाला. निबंधक कार्यालयाकडून निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्तीही झाली आहे. सुटीच्या कालावधीत निवडणूक घेऊ नये, असा प्रयत्न एका गटाकडून होत आहे.

हेही वाचा: म्हणतात ना...देव तारी त्याला कोण मारी...

‘एनडीएसटी’ विविध कारणांनी चर्चेत असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (Bribery Prevention Department) कारवाई, बेकायदेशीर नोकरभरती आणि थेट संस्थेच्या अध्यक्षाला झालेली अटक, कर्जासाठी प्रतीक्षा यादी, वादग्रस्त खरेदी आदी मुद्दयांनी शैक्षणिक वर्तुळात आरोपांच्या फैरी बघायला मिळणार आहेत.

हेही वाचा: बालविवाहविरोधात काम करण्याची गरज : डॉ. प्रमोद पांढरे

दरम्यान, जिल्ह्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा, खाजगी अनुदानित आश्रमशाळातील तब्बल साडे अकरा हजार सभासद मतदार आहेत. विद्यमान संचालक मंडळ, विरोधी गट यांच्यात पॅनल निर्मितीवर आतापासूनच चाचपणी सुरू आहे. सोसायटीच्या निवडणुकांना दोन वर्षे मुदतवाढ मिळाल्याने अनेक संभाव्य उमेदवारांचे निवडणुकीचे स्वप्न भंगले आहे. नवागतांना या निमित्ताने संधी आहे. मतदार विद्यमान संचालक मंडळाला सभासद पुन्हा संधी देतात की सत्तापरिवर्तन होते, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. सोशल मीडियावर (Social media) आरोप प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्याने निवडणुकीची वादळी चुणूक बघायला मिळते आहे. निवडणूक रंगंतदार होणार असून, जिल्ह्यातील मोठ्या संस्थाचालकांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.

Web Title: Cooperative B Class Credit Unions Elections Announced Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..