Nashik Corona Update : दीड हजारांनी घटली ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona active patients decreased by one and half thousand nashik
नाशिक : दीड हजारांनी घटली ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या

नाशिक : दीड हजारांनी घटली ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या

नाशिक : कोरोना प्रादुर्भावाच्‍या दृष्टीने जानेवारी महिन्‍याची सुरवात आव्‍हानात्‍मक राहिली होती; परंतु महिन्‍याचा शेवट काहीसा दिलासादायक ठरत आहे. तब्‍बल २३ दिवसांनंतर रविवारी (ता. ३०) जिल्ह्यात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या एक हजारापेक्षा कमी राहिली. दिवसभरात ९५७ रुग्‍णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह आले. पाच बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. दुसरीकडे दोन हजार ४०३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत तब्बल एक हजार ४५१ ने घट झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या पंधरा हजार ५४९ झाली आहे.

हेही वाचा: "राहुल गांधी हे फेक गांधी, भाजपचं करतंय महात्मा गांधींच स्वप्न पूर्ण"

यापूर्वी ७ जानेवारीला ८३७ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले होते. मात्र, त्‍यानंतर सातत्‍याने एक हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळत होते. अशात रविवार हा जिल्‍हावासीयांसाठी काही प्रमाणात दिलासादायक राहिला. दिवसभरात ९५७ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ७०८, नाशिक ग्रामीणमधील २१४, मालेगाव मनपा क्षेत्रातील दहा, तर जिल्‍हाबाहेरील पंचवीस रुग्‍णांचा समावेश आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ५१५ अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ३३५, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील १६८, तर मालेगावच्‍या बारा रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत घट होत असली, तरी मृतांचा वाढता आकडा चिंताजनक आहे. रविवारी पाच बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. मृतांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्र व नाशिक ग्रामीण क्षेत्रातील प्रत्‍येकी दोघांचा, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात एका बाधिताचा समावेश आहे.

हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष

पॉझिटिव्हिटी दरात घसरण

काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर चाळीसपर्यंत पोचला होता. परंतु या दरामध्येही मोठी घसरण झालेली आहे. रविवारी जिल्ह्यात तीन हजार ५४५ स्‍वॅब चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ९५७ पॉझिटिव्‍ह आढळले. हा पॉझिटिव्हि‍टी दर २७ टक्‍के राहिला आहे.

कोरोना निर्बंधांचा आज फेरआढावा

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, असे असले तरी रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या मात्र कमी आहे, तसेच कोरोना प्रतिबंधाचा उपाय म्हणून निर्बंधही सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. ३१) दुपारी चारला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक होणार आहे. कोरोनाच्या साप्ताहिक आढावा बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन त्यानुसार कोरोनाविषयक निर्बंधाचा फेरआढावा घेतला जाणार आहे.

Web Title: Corona Active Patients Decreased By One And Half Thousand Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top