esakal | कोरोना काळातील 'एका लग्नाची गोष्ट!' मास्क लावूनिया वऱ्हाडी जनहो...
sakal

बोलून बातमी शोधा

yeola wedding

कोरोना काळातील 'एका लग्नाची गोष्ट!' मास्क लावूनिया वऱ्हाडी जनहो...

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : लग्न पाहावे करून अशी जुनी म्हण आहे. कोरोना काळात ही म्हण तंतोतंत लागू होताना दिसते. अनेकांनी आपले लग्नसमारंभ पुढे ढकलले आहेत. काही जण काळजीपूर्वक ते उरकत आहेत. अशाच २५ जणांच्या उपस्थितीत झालेल्या एका लग्नाची गोष्ट चर्चेत आली आहे.

शुभ मंगल सावधान...

तेजस लाड व औरंगाबाद येथील पूनम कुलकर्णी यांचा विवाह शासकीय नियमांचे पालन करत झाला. हा विवाह होत असताना शुभ मंगल सावधान... हे मंगलाष्टकाचे सूर निनादलेच, पण कोरोची जनजागृती करणाऱ्या मंगलाष्टकांचे गायन गुरुजींनी केले म्हणून हा विवाह झाला. चक्क जनजागृतीपर मंगलाष्टके अन् संपूर्ण मंडपात कोराना जनजागृतीचे फलक लावून झालेल्या लग्नाची जोरदार चर्चा येथे सुरू आहे.

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर

‘मास्क नाही तर प्रवेश नाही’

सोबतच मंडपात चौफेर कोरोना जनजागृतीचे विविध संदेश फलक या दोन्ही कुटुंबीयांकडून लावण्यात आले होते. मंडपातील ‘कोरोनाला हरवू या, देशाला वाचवू या’, ‘झाली जरी सर्दी, प्रकर्षाने टाळा गर्दी’, ‘ठेवूया एक मीटर अंतर, कोरोना होऊ दे छूमंतर’, ‘हात जोडून नमस्कार, हाच खरा शिष्टाचार’, ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’, ‘कोरोनाला घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका’, ‘नियम पाळा, कोरोना टाळा’, ‘विनाकारण प्रवास करणे टाळा’, असे विविध कोरोना जनजागृती फलकाने लग्न मंडपाला आगळीवेगळी शोभा आणली होती. लग्नात आलेल्या पाहुण्यांचे थर्मल गन व प्लस ऑक्सिमीटरच्या सहाय्याने तपासणी करण्यात येत होती.

हेही वाचा: भाजप नगरसेविकेच्या भावाचा कोरोनाने मृत्यू; समर्थकांची हॉस्पिटलमध्ये तोडफोड

मास्क लावूनिया वऱ्हाडी जनहो...

‘मास्क लावूनिया वऱ्हाडी जनहो, प्रवेशद्वारी सॅनिटायझर शिंपितसे... फक्त २५ आमंत्रित आप्तजन टेंपरेचरची नोंद होत असे’, अशा आशयाचे मंगलाष्टक म्हटले गेले. शासनाने घालून दिलेल्या अटीनुसार आम्ही विवाह सोहळा पूर्ण केला. हा विवाह होताना त्यातून उपस्थितांना समाजामध्ये कोरोनाविषयी जागृती व्हावी, या हेतूने आम्ही सर्वत्र सुभाषितांचे फलक लावले. शिवाय मंगलाष्टकेदेखील प्रबोधनात्मक म्हणून हा समाजप्रबोधन पर विवाहसोहळा झाल्याची प्रतिक्रिया वराचे वडील शैलेश लाड व मुलीचे वडील लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी दिली.

loading image