Omicronमुळे लगीनघाईला पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची शक्यता... | Corona | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage News

Omicronमुळे लगीनघाईला पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची शक्यता...

नांदगाव (जि. नाशिक) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे (Corona third wave) संकट घोंगावत असल्याचा परिणाम आता पुढील सप्ताहात सुरु होणाऱ्या विवाह सोहळ्यावर पडण्याची शक्यता दिसत आहे. अर्थात, राज्य शासनाने विवाह सोहळ्यासाठी नियमावली घालून दिली असून, ५० वऱ्हाडींनाच विवाह सोहळ्यास हजेरी लावता येणार आहे. मात्र, त्यामुळे थाटामाटाची लगीन घाई उरकणाऱ्या मंडळींना आपल्या हौसेला मुरड घालावी लागणार आहे. एकूणच कोरोना (Corona) व ओमिक्रॉनने (Omicron) विवाह सोहळ्यावरच संक्रात आणली, अशी भावना भावी वधू- वरांच्या गोटात निर्माण झाली आहे.

लॉकडाउनच्या भीतीने धास्तावली वधू- वराकडील मंडळी

गेल्या आठवड्यात असलेल्या बाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सतर्कता म्हणून शासनाने शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यासोबत संचारबंदी आणि जमावबंदीदेखील लागू केली. पुन्हा लॉकडाउन (Lockdown) उदभवते का, असा प्रश्‍न सर्वांनाच पडलेला असताना २० जानेवारीपासून सुरु होणाऱ्या लगीनघाईला पुन्हा ब्रेक लागतो का, या शंकेने वधू- वराकडील मंडळी धास्तावली आहे.

हेही वाचा: नाशिक : जिल्ह्याची ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण 8 हजारांच्‍या उंबरठ्यावर


जानेवारीच्या २० तारखेपासून २०, २२, २३, २७, ३० असे पाच मुहूर्त आहेत. फेब्रुवारी महिन्यात सहा मुहूर्त असून, त्यात ५, ६, ७, १०, १७ या तारखा तर मार्च महिन्यात अवघे चारच मुहूर्त असून, त्यात २५, २६, २७, २८ या तारखा विवाहयोग्य आहेत. कोरोनाकाळात मागील दोन वर्षात कोरोना सावटामुळे धुमधडाक्यात लग्नाचा बार उडविताना मर्यादा आल्या होत्या. आताही तशीच स्थिती उद्‌भवू नये म्हणून शासनाने नियमावली घोषित करीत उपस्थितीची मर्यादा पन्नासवर आणून टाकल्याने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. थाटामाटात होणारा विवाह मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत उरकावा लागणार असल्याने हिरमोड होणार आहे.

दुसरीकडे पुरोहित, मंगल कार्यालये, केटर्स, बँड, घोडेवाला, लग्नपत्रिका, कापड विक्रेते अशा लहान- मोठ्या व्यावसायिकांवर मात्र परिणाम होणार आहे.


''अगोदर कोरोना व आता ओमिक्रॉनच्या संकटामुळे पुरोहितांच्या दैनंदिन व्यवहारावर मात्र परिणाम झाला आहे. असे असले तरी आरोग्याच्या दृष्टीने काळजी सर्वांनाच घ्यायची आहे. मुहूर्त ठराविक असल्याने आहे त्या परिस्थितीला सामोर जाण्याशिवाय गत्यंतर नाही.'' - विनित कुलकर्णी, पुरोहित, नांदगाव

हेही वाचा: संक्रांतीची तयारी जोमात, वातावरणामुळे उत्साह कोमात!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top