संक्रांतीची तयारी जोमात, वातावरणामुळे उत्साह कोमात! | Makar Sankranti festival | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Makar sankranti festival

संक्रांतीची तयारी जोमात, वातावरणामुळे उत्साह कोमात!

येवला (जि. नाशिक) : अहमदाबाद अन् सुरतेचे भावंड असलेल्या पैठणीच्या नगरीत पतंगोत्सवाच्या सुनामीची तयारी पूर्ण झाली आहे. भोगीच्या सूर्योदयाबरोबर छतावर एकच जल्लोष अन् आकाशात सप्तरंगी पतंगाची रेलचेल दिसायला लागेल. संपूर्ण पैठणीनगरी या उत्सवासाठी आसारी, मांजा, पतंग खरेदी करून आणि डिजेची उपलब्धता करून तयार झाली आहे. मात्र रोजच दुपारपर्यंत असणारे ढगाळ हवामान, वातावरणातील प्रचंड गारवा अन पुरेशा वाऱ्याच्या अभावामुळे या उत्सवाला काहीसा स्पीड ब्रेकर लागण्याची भिती आहे. (Makar Sankranti festival)

पंतगोत्सवासाठी येवलेकर सज्ज...

येथे सोळाव्या शतकात शहराच्या स्थापनेनंतर गुजराती समाजबांधव आले आणि त्यांनी पतंगोत्सव शहरात आणला. आज मात्र या उत्सवाने सर्व सीमा पार करत सर्व समाजासह मुस्लिमबांधवांनाही आपलेसे केले आहे. प्रत्येक घरातील आबालवृद्ध तर तीन दिवस पतंग उडविण्याचा आनंद लुटतात. पण अनेक महिला व तरुणीही यात सहभागी होतात. पतंगोत्सवाची सर्व तयारी येवलेकरांनी करून ठेवली आहे. पतंग, मांजा, आसारीची खरेदी तर केव्हाच झाली आहे. पण गच्ची स्वच्छ करण्यासह डिजेचे बुकिंग, मित्रांची जमवाजमव अन्‌ पाहुण्यांना येथे येण्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे. पतंगाचा हा उत्सव शुक्रवारी अधिकच फुलणार आहे.

हेही वाचा: नाशिक बाजार समितीविरुद्ध ‘ईडी’कडे तक्रार

कटी रेऽऽकटी... च्या घोषणांनी दुमदुमतो आसमंत

अहमदाबाद, सुरतपाठोपाठ येवला या तीन शहरांतच पतंगोत्सवाची धूम असते. म्हणूनच सुरतचे भावंड म्हणूनच या गावाची ओळख आहे. मकरसंक्रांतीसह भोगी व कर हे तीन दिवस जणू मंतरलेलेच असतात. या तिन्ही दिवशी रस्ते निर्मनुष्य...कामाला सुटी...तहानभूक विसरून घरांच्या गच्च्या फुल्ल असतात. आकाश सप्तरंगी पतंगांनी गजबजून गेलेले असते. आजी-आजोबा, आई-वडील, मुलगा- सून अन्‌ नातूही असे चार पिढ्यांच्या सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग नजरेत भरणारा असतो. शौकिनांच्या उत्साहाने धाबे फुलतात... अन्‌ मग होतो जल्लोष... पतंगाची अवकाशात गवसणी घालतानाच काटाकाटीचा खेळही रंगतो. दोर कापल्यानंतर वका...ऽरेऽऽ, कटी रेऽऽकटी... च्या घोषणांना आसमंत दुमदुमून जातो. जोडीलाच डीजेची साद नूर फुलविणारी ठरते.

दोन आठवड्यापासून रोजच ढगाळ हवामान आहे. एखाद्या दिवशी तर दुपारपर्यंत ढगाळ हवामान असते. या वातावरणात गारवा असला तरी वाऱ्याचे प्रमाण नगण्य नसते. शिवाय पतंग उडविण्यासाठी स्वच्छ, निरभ्र, आकाश नसल्याने शौकिनांचा मुडही नसतो. त्यामुळे अशा अस्वच्छ आणि वारा नसलेल्या वातावरणाने शौकिनांचे टेन्शन वाढविले आहे. पुढील तीन दिवस तरी आकाश निरभ्र राहून पतंग उडविण्यासाठी आवश्यक वारा सुटण्याची साद येवलेकर शौकीन निसर्गाला घालत आहे.

हेही वाचा: सावधान! गुलाबी थंडीत चोरट्यांचा तडाखा; 2 दिवसांत 3 घरे फोडली

वारा अन् पतंगाचा संबंध!

वारा नसेल तर पतंग गगनभरारी कशी घेणार असा प्रश्न आहे. वाऱ्याशिवाय पतंग हलतच नाही. वाऱ्याने ढकलल्यामुळे पतंग उडत असतो व वारा पतंगावर जोर ठेवतो. पतंग हवेपेक्षा वजनदार असल्याने हवेत उडविण्यासाठी वाऱ्याची नितांत गरज असते. वारा पतंगाला हवेत उडवून देऊ शकतो, कारण पतंग वाऱ्याला थोडासा कोनात असतो. हे आहे पतंग उडण्याचे सायंटिफिक कारण. त्याच्या हलक्या सामग्रीमुळे पतंग जमिनीपासून वर उचलतो आणि वाऱ्यावर झुकलेला असतो तेव्हा तो उडतो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top