
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण चारशेपेक्षा कमी
नाशिक : जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. गेल्या पाच दिवसांत ही संख्या शंभराहून अधिकने कमी झाली आहे. त्यातच सोमवारी (ता. १५) जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या चारशेच्या आत आली. दिवसभरात ५४ रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. एका बाधिताचा मृत्यू झाला. यातून सद्यःस्थितीत उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या ३९७ झाली आहे.
गेल्या ११ नोव्हेंबरला जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट राहिली होती. त्यातच सातत्याने कोरोनामुक्त रुग्णांची अधिक राहत असलेल्या संख्येमुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत प्रथमच ही संख्या चारशेपेक्षा कमी राहिली. सोमवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील ३२, नाशिक ग्रामीणमधील २२ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. एका बाधिताच्या मृत्यूची नोंद असून, हा मृत नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहे.
हेही वाचा: नाशिक : उड्डाणपुलावर उभ्या कंटेनरला कारची धडक; एक ठार
प्रलंबित अहवालांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार सुरू आहे. एक हजार आठ रुग्णांचे अहवाल सायंकाळी उशिरापर्यंत प्रलंबित होते. यापैकी ७०१ नाशिक ग्रामीणमधील, १५५ नाशिक शहरातील, तर मालेगावच्या १५२ रुग्णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्हाभरातील रुग्णालये व गृहविलगीकरणात ४९९ रुग्ण दाखल झाले. यापैकी ४९४ रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रातील होते. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात एकही रुग्ण दाखल झाला नव्हता. त्यात सोमवारी दोन रुग्ण दाखल झाले.
हेही वाचा: शिवशाहिरांचे नगरशी अतूट स्नेहबंध
Web Title: Corona Update Less Than 400 Active Patients Reported In District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..