esakal | नाशिक : 'जशास तसे' उत्तर देणाऱ्या नगरसेवक शहाणेंना फडणवीसांकडून बळ
sakal

बोलून बातमी शोधा

corporator mukesh shahane was lauded by devendra fadnavis

'जशास तसे' उत्तर देणाऱ्या नगरसेवक शहाणेंना फडणवीसांकडून बळ

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : गेल्या आठवड्यात भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ज्येष्ठ नेत्यांनी शिवसैनिकांचे कौतुक केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजीमंत्री गिरीश महाजन, नाशिकचे प्रभारी जयकुमार रावल यांनीदेखील नगरसेवक मुकेश शहाणे यांचे कौतुक करत पाठबळ दिले.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. नाशिकमध्ये भाजप वसंतस्मृती कार्यालयावर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दगडफेक केली होती. दगडफेकीचे वृत्त शहरभर पसरल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या वेळी जशास तसे उत्तर देण्याचा भाग म्हणून शिवसेना कार्यालयावर कार्यकर्त्यांसह नगरसेवक शहाणे चाल करून गेले. या वेळी रस्त्यावर सुरू असलेल्या कामाचे फावडे उचलून नगरसेवक शहाणे शिवसेना कार्यालयाच्या दिशेने निघाले. त्यानंतर सेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. त्यांनतर राजकीय शाब्दिक लढाई सुरू झाली. मुंबई, ठाणे व कल्याण मध्ये शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर हल्ला केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक केले. नाशिकमध्ये युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडले. त्यांची भेट खासदार संजय राऊत यांनी घेतली. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपने दखल घेत जशास तसे उत्तर देणाऱ्या नगरसेवक शहाणे यांचे कौतुक केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री गिरीश महाजन यांनी मोबाईलवरून कौतुक केले, तर भाजप कार्यालयात, नाशिकचे प्रभारी जयकुमार रावल यांनी सत्कार केला.

हेही वाचा: रस्ता चुकल्याने गुजरातचे पर्यटक रात्रभर किल्ल्यावरच

स्थानिक नेत्यांची अडचण

नगरसेवक मुकेश शहाणे यांनी शिवसेनेविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिस कारवाई सुरू झाली. या वेळी आमदार राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती गणेश गिते वगळता भाजपच्या सर्वच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हात वर केले, परंतु फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, जयकुमार रावल यांनी कौतुक केल्याने स्थानिक नेत्यांची अडचण झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: 'गवळींनी ट्रस्टची ७० कोटींची संंपत्ती पीएच्या नावावर केली'

loading image
go to top