esakal | मानधन न दिल्याने गॅस दाहिनी बंद; मृतदेहांचे वेटिंग वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

funeral

मानधन न दिल्याने गॅस दाहिनी बंद; मृतदेहांचे वेटिंग वाढले

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कधी बेडची कमतरता, कधी रेमडेसिव्हिर इंजेक्शन, तर कधी ऑक्सिजन तुटवड्याचा सामना करणाऱ्या नाशिककरांना आता नाशिक अमरधाममधील गॅस दाहिनी बंद पडल्याने अडचणीला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेचा वैद्यकीय विभाग व आरोग्य विभागाकडून जबाबदारी ढकलण्याच्या या प्रकरणामुळे अंत्यसंस्कारासाठी वेटिंग मात्र वाढले आहे.


अंत्यसंस्कारासाठी सहा ते सात तासांचे वेटिंग

दोन महिन्यांपासून शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांबरोबरच मृत्यू संख्येतही मोठी वाढ झाली आहे. १६ एप्रिलपर्यंत दोन हजार ३९० मृतांवर लाकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरात महापालिकेच्या १७ स्मशानभूमी आहेत. त्यातील नाशिक अमरधाममध्ये लाकडाबरोबरच विद्युत व गॅस शवदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे विद्युत किंवा गॅस दाहिनीमध्येच दहन करण्याच्या सूचना आहेत. मात्र, मृतांची संख्या वाढल्याने लाकडावर दहन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी विद्युत दाहिनी बंद पडल्याने तातडीने महापालिकेने नवी मुंबई येथून तंत्रज्ञ बोलावून दुरुस्ती केली होती. या वर्षी आता गॅस दाहिनीची अडचण निर्माण झाली आहे. मात्र, ही अडचण तांत्रिक नसून महापालिकेच्या वैद्यकीय विभाग व आरोग्य विभागाकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रकारामुळे निर्माण झाली आहे. गॅस दाहिनीवर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना मानधन न मिळाल्याने त्यांनी दहा दिवसांपासून काम बंद केले आहे. काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी यासंदर्भात आठ दिवसांपूर्वी पत्र देऊनही अद्यापही दखल घेतलेली नाही. गॅस दाहिनीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधन न दिल्याने दहा दिवसांपासून गॅस दाहिनी बंद आहे. गॅस दाहिनीवर ताशी एका मृतावर अंत्यसंस्कार केले जातात. २४ तासांचा विचार करतात. रोज २४ अंत्यसंस्कार होत असल्याने वेटिंग कमी होते. सध्या दाहिनी बंद असल्याने विद्युत दाहिनी व लाकडांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सहा ते सात तासांचे वेटिंग आहे.

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर


जबाबदारी ढकलण्याचा प्रकार

कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अंतिम प्रवासातही अडचणी दूर करणे गरजेचे असताना वैद्यकीय व आरोग्य विभागाकडून एकमकांकडे बोट दाखविले जात आहे. दोन कर्मचाऱ्यांचे मानधन थांबल्याने गॅस दाहिनी बंद आहे. परिणामी, मृतांची संख्या वाढत असताना अंत्यसंस्कारावर परिणाम होत असल्याने तातडीने मानधनावर कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी होत आहे.


नाशिक व पंचवटी अमरधाममध्ये मृतांवर अंत्यसंस्कार करण्याकडे नातेवाइकांचा कल आहे. या परिस्थितीत लाकडांवर मृतदेह जाळण्याची व्यवस्था करण्याबरोबर विद्युत व गॅस दाहिनी सक्षम असणे गरजेचे आहे. गेल्या दहा दिवसांपासून गॅस दाहिनी कर्मचाऱ्यांना मानधन न मिळाल्याने बंद असल्याने मृतदेहांचे वेटिंग वाढले आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करावी.
-विमल पाटील, नगरसेविका

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती : केंद्र सरकारकडून मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत

loading image
go to top