काहीही झाले तरी 'त्यांचे' मनोबल खचता कामा नये...म्हणून पुन्हा सज्ज झाले कोरोना फायटर्स!

nivara chhavni.jpg
nivara chhavni.jpg

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहा आठवड्यांपासून लॉकडाउन सुरू आहे. यामुळे मेट्रोसिटींमध्ये लाखो परप्रांतीय मजूर, कामगार वर्ग अडकून पडले आहेत. त्यांच्या गावांच्या दिशेने निघालेल्या या परप्रांतीयांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेत निवारा छावण्यांमध्ये ठेवले आहे. मात्र ज्या मानसिकतेतून त्यांनी शहर सोडले आणि आता निवारा छावणीत अडकले, ते पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्‍यता होती. त्यासाठी जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार विभाग सरसावला आहे. या विभागातील मानसोपचार तज्ज्ञ, कर्मचाऱ्यांनी निवारा छावण्यातील एक हजार 375 परप्रांतीयांशी संवाद साधत, त्यांना मानसिक बळ देण्याचा आणि त्यासाठी औषधोपचार करीत समुपदेशन केले. 

निवारा छावण्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परप्रांतीयांशी संवाद

कोरोनामुळे अडकून असलेले शेकडो परप्रांतीय मिळेल त्या मार्गाचा अवलंब करीत आहेत. शेकडो किलोमीटरचे अंतर पायीच जाण्याचा निर्णय घेताहेत. मुंबई, ठाणे परिसरातून नाशिकमार्गे निघालेल्या एक हजार 375 परप्रांतीयांची रवानगी शहरातील विविध निवारा छावण्यांमध्ये केली आहे. ज्या मानसिकतेतून परप्रांतीयांनी शहरे सोडली, पण त्यानंतरही गावी न जाता निवारा छावण्यांमध्ये अडकून आहेत. यामुळे त्यांची मानसिकता ढळमळीत होऊन बिघडण्याची शक्‍यता आहे. सततची चिंता, चिडचिडीमुळे मानसिक असंतुलन बिघडून त्यातून कोणताही अनुचित प्रकारही घडू शकतो. ही बाब हेरून जिल्हा रुग्णालयाचे मानसोपचार विभागप्रमुख डॉ. नीलेश जेजूरकर, डॉ. स्वाती चव्हाण यांनी पथकासह या निवारा छावण्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परप्रांतीयांशी संवाद साधला. त्यांचे मनोबल टिकवून ठेवतानाच, मनोधैर्य वाढविण्यासाठी समुपदेशन केले. शहर-जिल्ह्यातील निवारा छावण्यांमध्ये संवाद साधताना, त्यांच्यातील काहींना मधुमेह, रक्तदाब यांसह विविध स्वरूपाच्याही व्याधी आहेत. त्यांची माहिती घेत, ज्यांच्याकडे औषधे नाहीत त्यांना पथकाने औषधेही उपलब्ध करून दिली. 

क्वारंटाइन रुग्ण अन्‌ सिव्हिलमधील कर्मचाऱ्यांचेही समुपदेशन 

तपोवनातील क्वारंटाइन कक्षासह अन्य विलगीकरण कक्षात असलेल्या 160 रुग्णांचेही मानसोपचार पथकाने समुपदेशन केले. 14 दिवस घरात एकांतात राहावे लागणाऱ्यांना मानसिक तणावाची शक्‍यता असते. ते लक्षात घेता, पथकाकडून अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या. तसेच, पथकाकडून होम-क्वारंटाइन झालेल्या 260 जणांना थेट मोबाईलवरून संपर्क साधून त्यांचे मनोधैर्य वाढविले. 

दहा मनोरुग्णही सापडले 

दरम्यान, वेगवेगळ्या निवारा छावण्यांमध्ये दहा मनोरुग्णही पथकाला सापडले. त्यांना निवारा छावणीमध्ये तपासून मानसोपचारतज्ज्ञ डॉ. स्वाती चव्हाण यांच्या देखरेखीखाली औषधोपचार सुरू आहेत. सिव्हिलच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. नीलेश जेजूरकर, डॉ. स्वाती चव्हाण, क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट सायली बोंद्रे, सोशल वर्कर अरविंद पाईकराव, परिचारिका शीतल अहिरराव, श्री. अगोणे, घोडके यांचे पथक मेहनत घेत आहे. 

कोरोनामुळे अडकून असल्याने त्यांच्या मानसिकतेत चिडचिडेपणा येऊन ते असंतुलित होऊ शकतात. म्हणून त्यांच्याशी सतत संवाद साधणे आवश्‍यक आहे. यातून त्यांचे मनोधैर्य वाढेल. वेळप्रसंगी औषधोपचारही सुरू आहेत. - डॉ. नीलेश जेजूरकर, मानसोपचारतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com