esakal | सटाण्यात जनता कर्फ्यूचा फज्जा; नागरिकांची बाजारपेठेत ‘फुल्ल टू’ गर्दी

बोलून बातमी शोधा

Satana City Market
सटाण्यात जनता कर्फ्यूचा फज्जा; नागरिकांची बाजारपेठेत ‘फुल्ल टू’ गर्दी
sakal_logo
By
रोशन खैरनार

सटाणा (जि. नाशिक) : शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, वेळेवर ऑक्सिजन आणि उपचार न मिळाल्याने गेल्या पंधरा दिवसात अनेक तरुणांचा मृत्यूही झाला आहे. या परिस्थितीत पुकारण्यात आलेल्या १५ दिवसांच्या जनता कर्फ्यूचा सटाणा शहरात फज्जा उडाल्याचे चित्र असून, शासनाने जाहीर केलेल्या कठोर निर्बंधानाही बेजबाबदार नागरिकांकडून हरताळ फासला जात आहे.

भाजीपाला आणि आंबे खरेदीसाठी बाजारपेठेसह साठ फूटी रस्त्यावरील दैनंदिन भाजीपाला बाजारात नागरिकांची मोठी गर्दी उसळत आहे. अक्षरशः कोरोनाचे सर्व नियम पायंदळी तुडवत नागरिकांनी बाजारपेठेत ‘फुल्ल टू’ गर्दी केली असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत असल्याने एकप्रकारे कोरोनाला आमंत्रणच दिले जात आहे. शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू असून तालुक्यात दररोज सरासरी १५० हून अधिक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. या व्यतिरिक्त अनेक रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. वेळेवर ऑक्सिजन आणि उपचार न मिळाल्याने गेल्या पंधरा दिवसात शहरातील अनेक तरुणांचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर १५ एप्रिल ते १ मेपर्यंत १५ दिवस शहरात कडकडीत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे शहरवासियांकडून जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर करताना सकाळी ७ ते ११ या वेळेतच अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, सध्या आंब्यांचा सीझन असल्याने आंबे खरेदीसाठी शहरातील टिळक रोडवरील मुख्य बाजारपेठेतील जामा मशीद परिसर तर बसस्थानकामागील साठ फूटी रस्त्यावरील दैनंदिन भाजीपाला बाजारात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची दररोज मोठी गर्दी उसळत आहे. मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद असली तरी दररोज लहान-मोठी वाहने घेऊन नागरिक बिनदिक्कतपणे शहरातील गल्लीबोळात ये-जा करीत आहेत.

हेही वाचा: मुले असूनही ती ठरली बेवारस! ओझरकरांनी माणुसकी दाखवत केले अंत्यसंस्कार

पोलिस प्रशासनाने शहरात विनाकारण फिरणार्‍या नागरिकांवर वेळोवेळी कारवाई करून त्यांच्या रॅपिड अॅंटीजेन टेस्टही केल्या. मात्र, तरीही शासनाचे नियम डावलून शहरवासीय बिनधास्तपणे शहरात विनाकारण फिरून कोरोना संसर्गाला आमंत्रण देत आहेत.

विनामास्क आणि विनाकारण फिरणारे सुपर स्प्रेडर…

शहरात अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत, सुरक्षित अंतर ठेवत नाहीत. साठ फूटी रस्त्यावरील दैनंदिन भाजीपाला बाजार असो की टिळक रोडवरील जामा मशीद परिसर या दोन्ही ठिकाणी विक्रेते दाटीवाटीने बसलेले असतात. किराणा दुकान, फळांची दुकाने, बँका आणि इतर ठिकाणी सुद्धा नागरिक सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत असून, कोरोनाचे सर्व नियम पायंदळी तुडवत शासनाच्या आदेशांची पायमल्ली करताना दिसत आहे. बागलाण तालुक्यात सध्या अधिकृतरित्या १५९८ सक्रिय रुग्ण असले तरी ग्रामीण व शहरी भागातील कोविडची लक्षणे असलेले अनेक रुग्ण खासगी दवाखान्यात कोणत्याही तपासण्या न करता तात्पुरते उपचार घेत आहेत. तर काही रुग्ण मेडिकल दुकानातून तात्पुरत्या गोळ्या औषधे घेऊन घरीच उपचार घेत असल्याने ते इतर कुटुंबियांनाही बाधित करत असल्याचे दिसून आले आहे. हे रुग्ण दररोज शहरातील विविध दुकाने, भाजीबाजार, कार्यालये, बँका आदि ठिकाणी बिनधास्तपणे फिरून कोरोनाचा संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे कडक निर्बंध असतांनाही हेच नागरिक सुपर स्प्रेडर ठरत असल्याने तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

हेही वाचा: दीडशे किलोमीटरचा प्रवास अन् प्लाझ्मा दानातून शिक्षकाने ओतला ‘प्राण’!

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार, वैद्यकीय अधिकारी, पोलिस प्रशासन आणि महसूल विभाग आपले कर्तव्य चोख बजावत आहे. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनासोबत सटाणा शहरातील नागरिकांचीही तितकीच जबाबदारी आहे. भविष्यात कोरोनाला अटकाव घालायचा असेल तर प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.

- पंडितराव अहिरे, सामाजिक कार्यकर्ते, सटाणा