esakal | मुले असूनही ती बेवारस! ओझरकरांनी माणुसकी दाखवत केले अंत्यसंस्कार

बोलून बातमी शोधा

Ozar

मुले असूनही ती ठरली बेवारस! ओझरकरांनी माणुसकी दाखवत केले अंत्यसंस्कार

sakal_logo
By
उत्तम गोसावी

ओझर (जि. नाशिक) : जगात श्रावणबाळाप्रमाणे आई-वडिलांची सेवा करणारेही बघायला मिळतात आणि जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडणारेही कमी नाहीत. आपल्या आईला शेवटचा निरोप देण्यासाठी मुले उपस्थित नसतील तर यासारखी दुर्दैवी बाब नाही. असाच प्रकार ओझर येथे घडला. मुले असूनही बेवारस ठरलेल्या मातेला येथील युवकांनी अग्नी देऊन समाजात माणुसकी शिल्लक असल्याचा संदेश दिला आहे.

ती बेवारसच ठरली…

ओझर येथील बसस्थानकावर दीड वर्षापासून एक वृद्ध महिला राहत होती. दोन दिवसांपूर्वी तिचे अकस्मात निधन झाले. मात्र, संबंधित महिला बेवारस असल्याने खांदा देण्यासाठी कोणीही पुढे येईना. शेवटी चंद्रशेखर असोलकर, सचिन कायस्थ, जाफर पठाण, गणेश धोत्रे या युवकांनी माणुसकी दाखवत या मातेला अखेरचा निरोप दिला. दरम्यान, संबंधित महिलेच्या वारसांचा शोध पोलिसांना लागला. तिची तीन मुले नाशिकजवळील आडगाव येथे राहत असल्याचे समजले. सर्व मुले उच्चशिक्षित आहेत. मृत महिलादेखील एक शिक्षिका होती. परंतु निवृत्तीनंतर तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने मुलांनी तिला वाऱ्यावर सोडून दिले. त्यामुळे ती बेवारस अवस्थेत गावोगाव फिरू लागली आणि ओझर बसस्थानकच तिचे घर झाले. संबंधित महिला शिक्षिका असल्याने पेन्शन घेण्यासाठी मुले नियमित तिच्या भेटीला येत असत, असे स्थानकाजवळील नागरिक सांगतात. परिसरातील व्यावसायिक दररोज तिला चहा, नाश्‍ता देत. तिच्या नावावर बरीच जमीन असल्याचेही समजते. एवढे असूनही ती बेवारसच ठरली.

दोन दिवसांपूर्वी तिची कोरोनामुळे प्रकृती खालावली. तिला १०८ रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न झाला. परंतु बेड न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. तपासात तीन मुलांचा पत्ता सापडला आणि पोलिसांनी मुलांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. तीनपैकी फक्त दोन मुलांनी अंत्यविधीला येण्याची माणुसकी दाखविली.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..कोरोना महामारीत जवळचे नातलगही अंत्यविधीला येत नाही. माणुसकी धर्म जिवंत राहिला की नाही, असा प्रश्‍न पडतो. यापुढे अंत्यविधीस ओझरमध्ये कुणालाही मदत लागल्यास आपण मदत करू.
-चंद्रशेखर असोलकर, युवक, ओझर

हेही वाचा: नाशिकमध्ये रेमडेसिव्‍हिरचा पुन्हा काळाबाजार; पाच इंजेक्शनसह वॉर्डबॉय गजाआड