Nashik News : चंदनपुरीतील शिवलिंगसह धार्मिक ठिकाणीही दर्शनासाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandanpuri : An ancient Shivling on the bank of Girna river

Nashik News : चंदनपुरीतील शिवलिंगसह धार्मिक ठिकाणीही दर्शनासाठी गर्दी

मालेगाव : बानूबाईच्या चंदनपुरीतील श्री खंडेराव महाराज मंदिराच्या पायथ्यालगत असलेल्या गिरणा नदीत स्वयंभू शिवलिंग गेल्या वर्षी आढळले होते. या ठिकाणी घोड्याच्या टापांचे व घोडा बांधण्याच्या खुंट्याच निशाण आहे. शिवलिंगाला वज्रलेप करण्यात आला आहे.

त्यामुळे चंदनपुरीत श्री खंडेरायाचा यात्रोत्सव सुरु असून मल्हारभक्त या ठिकाणी देखील दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता जय मल्हार ट्रस्टतर्फे परिसरात स्वच्छता करण्यात आली आहे. (Crowds also gather religious places including Shivling in Chandrapur Cleanliness campaign in area by Jai Malhar Trust with Vajralepa to Shivling Nashik News)

हेही वाचा: Nashik News : दुभाजकीवर दुचाकी आदळून 2 तरुण ठार; एक गंभीर

चंदनपुरीची लेक असलेली बानूबाई व श्री खंडेराव महाराज यांची याच ठिकाणी भेट झाल्याचे पुराणात सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी नदीत शिवलिंग आढळल्याने पुणे येथील श्री स्वामी ओम मल्हार प्रतिष्ठानचे गौरव घोडे, चंदनपुरीतील जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील आदींनी महाअभिषेक केला होता. शिवलिंगाला वज्रलेप करण्यात आला आहे. शिवलिंग व या ठिकाणाचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

श्री खंडेरायाच्या जेजुरीनंतर चंदनपुरी येथील धार्मिक स्थळाला मोठे महत्व आहे. चंदनपुरीत पौषपौर्णिमेला खंडेराव महाराजांचा पंधरा दिवस यात्रोत्सव भरतो. जागरण गोंधळ (दिवट्या बुधल्या) आदी धार्मिक कार्यक्रमांची वर्षभर रेलचेल असते. गिरणा नदीच्या काठावर असलेल्या मुख्य मंदिरात श्री खंडेराय, म्हाळसा देवी व बानाई मातेची मूर्ती आहे.

बानाई देवी मुळची चंदनपुरीची आहे. जेजुरीत म्हाळसा देवींबरोबर सारीपाटचा डाव हरल्यानंतर श्री खंडेराव महाराजांनी चंदनपुरीत बानूबाईच्या घरी बारा वर्षे चाकरी केली. या काळात त्यांनी मेंढ्या चारल्या. बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतर गिरणा नदीच्या काठावर त्यांनी सातशे मेंढ्या मारुन टाकल्या. देवाला जाब विचारण्यात आला.

बानूबाईशी लगीन लावून द्या, मेंढ्या जिवंत करतो असे त्यांनी सांगितले. देवाने भंडारा उधळत मेंढ्या जिवंत केल्या. तसेच ते मुळ रूपात आले. देवाने चंदनपुरी वासियांना मुळ रूपाचे दर्शन दिले तेच हे ठिकाण असल्याचे सतीश पाटील यांच्यासह जुन्या जाणकारांनी सांगितले.

हेही वाचा: Nashik Municipal News : नाशिक मनपाचे अंदाजपत्रक होणार विलंबाने सादर

या संदर्भात गौरव घोडे, पिंपळगाव बसवंत येथील वैभव बोरस्ते यांना या ठिकाणी शिवलिंग असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी चंदनपुरीत येऊन महाअभिषेक केला होता. पाण्याच्या प्रवाहामुळे झिजलेल्या शिवलिंगला पुणे येथील अक्षय काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वज्रलेप लावला आहे. चंदनपुरी यात्रेनिमित्त आलेले मल्हार भक्त आता शिवलिंगाच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. जय मल्हार ट्रस्टतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या भागातील लहान झाडे झुडपे काढण्यात आली.

"चंदनपुरीत बारा वर्षे राहिल्यानंतर खंडेरायांनी गिरणा काठावर चंदनपुरी वासियांना दर्शन दिल्याचे सर्वश्रृत आहे. वज्रलेप केल्यानंतर शिवलिंग व इतर परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. शिवलिंगाची रोज पूजा केली जात असून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे. शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांना जाता यावे यासाठी डबर, पाइप टाकून तातडीने पक्का रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे."

- सतीश पाटील,अध्यक्ष, जय मल्हार ट्रस्ट,

हेही वाचा: Nashik News : विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राचे विस्तारीकरण; सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी

टॅग्स :MalegaonNashikCampaign