
Nashik : डॉ. महेंद्र महाजन यांचे गीनिज रेकॉर्ड
इंदिरानगर (जि. नाशिक) : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सायकलपटू डॉ. महेंद्र महाजन यांनी लेह ते मनाली हे ४३० किलोमीटर अंतर चार दिवस २१ तास आणि १८ मिनिटांत चालून पार करत नवी गीनिज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड (Guinness World Record) केले आहे.
विशेष म्हणजे गीनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी त्यांना आठ दिवसांची मुदत होती. अमेरिकेतील खडतर अशी रॅम स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय असलेले डॉ. महाजन यांनी हा रेकॉर्ड करत पुन्हा एकदा शहराचे नाव जागतिक पातळीवर अधोरेखित केले. (cyclists Dr Mahendra Mahajan Guinness World Record Nashik Latest Marathi News)
संपूर्ण प्रवासात त्यांनी चार लाख ७५ हजार ७२० इतकी पावले टाकून २८ हजार ९३ कॅलरीज खर्च केल्या, तर एकत्रित १८ हजार १४७ फूट उंचीचा प्रवास केला. ७ जुलैला सकाळी सहा वाजून १२ मिनिटांनी लडाखचे अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. एस. खंदारे आणि तेथील प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी या मोहिमेला सुरवात केली.
पहिल्या दिवशी त्यांनी मांगलानाला पासपर्यंतचे ९१ किलोमीटरचे अंतर पार केले. दुसऱ्या दिवशी लडाखमार्गे पांगपर्यंतचे ८४ किलोमीटर अंतर पार केले. तिसऱ्या दिवशी चुंगला पास, नकीला, गाता लुप्समार्गे सारचू पठारपर्यंतचे ७६ किलोमीटरचे अंतर पार केले. प्रचंड पाऊस, हाडं गोठवणारी थंडी त्यामुळे होणारी दमछाक यामुळे ते अपेक्षित अंतर या दिवशी पार करू शकले नाहीत.
चौथ्या दिवशी बारला चला पास दारछापर्यंतचे ७६ किलोमीटर अंतर त्यांनी पार केले. पाचव्या दिवशी चंद्रभागा नदीवरील तांडी पूल आणि जगप्रसिद्ध अटल टनलमार्गे १२ जुलैला पहाटे तीन वाजून ३० मिनिटांनी उर्वरित अंतर पार करून ते मनालीला पोचले. ते आणि त्यांचे वडील बंधू डॉ. हितेंद्र महाजन यांनी स्थापन केलेल्या महाजन बंधू फाउंडेशनतर्फे ही मोहीम आखण्यात आली होती.
हेही वाचा: नाशिकचे नगरसेवक शिंदेच्या संर्पकात; शिवसेनेत संशयाचा धुराळा
सुमीत पारिंगे, नितीन वानखेडे आणि त्यांचा पुतण्या ओम महाजन यांनी क्रू मेंबर्स म्हणून काम पाहिले. प्रवासात अत्यंत संथ गतीने चालणारे अनेक ट्रकचालक त्यांना भेटले.
त्यांनीदेखील त्यांचा उत्साह वाढवला. ‘हम फीट तो देश फीट, सुदृढ नागरिकच सशक्त देश उभारू शकतात’ हा संदेश देण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली होती. यापूर्वीदेखील महाजन बंधू आणि ओम याने सायकलिंग क्षेत्रात अनेक जागतिक विक्रम केले आहेत.
"‘हम फिट तो देश फिट’ हा संदेश देण्यासाठी ही मोहीम आखली होती. अत्यंत प्रतिकूल हवामान असलेल्या भागातून चालावे लागल्याने खऱ्या अर्थाने शरीर क्षमतेचा कस लागला. मात्र, पुन्हा एकदा गीनिज वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालून शहराचे नाव जागतिक पातळीवर नेऊ शकलो, याचे समाधान आहे. " - डॉ. महेंद्र महाजन
हेही वाचा: नाशिक : पाऊसामुळे रस्त्यावर खड्डे च खड्डे
Web Title: Cyclists Dr Mahendra Mahajan Guinness World Record Nashik Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..