Nashik : फिल्मीसिटीच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा विकास होणार
नाशिक : पर्यटकांसह नाशिककरांना वेगळ्या अनुभवासाठी महापालिका (NMC) चित्रमहर्षी दादासाहेब फाळके (dadasaheb Falake Smarak) यांच्या स्मारकाचा चित्रनगरीच्या धर्तीवर विकास करणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh pawar) यांनी दिली. नाशिकचे वैभव ठरण्याची क्षमता असलेल्या फाळके स्मारकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी फाळके स्मारक महापालिकेनेच चालवावा, अशी सूचना केल्यानंतर महापालिका प्रशासन सतर्क झाली आहे. (dadasaheb Phalke monument will be developed on the lines of Film City Nashik Development News)
श्री. पवार म्हणाले की, फाळके स्मारकाच्या विकासासाठी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकास करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. त्यासाठी अतिशय व्यावसायिक स्वरुपातील सल्लागार संस्थेची नेमणूक केली जाणार आहे. त्यानुसार स्मारकाचा विकास करण्याचे नियोजन आहे. मुंबईतील चित्रनगरीच्या (Mumbai filmcity) धर्तीवर करण्याचा प्रस्ताव तयार झाल्यानंतर वेगवेगळ्या त्या- त्या क्षेत्रातील संस्थाकडून ही संकल्पना राबविण्याचे विचाराधीन आहे. सल्लागार निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, एक चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी तयार करण्याचा मानस महापालिका आयुक्त पवार यांनी व्यक्त केला.
बीओटी, पीपीपी किंवा अन्य
चित्रनगरी साकारण्यासाठी महापालिकेपुढे अनेक पर्याय आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) याशिवाय खासगी संस्थेकडून प्रकल्प राबवून घेतल्यानंतर त्याच संस्थेकडून चालविताना त्यावर नियंत्रण मात्र महापालिकेचे असेल. सुरक्षा कर्मचाऱ्यापासून तर प्रशासकीय नियंत्रण महापालिकेचे असेल. अशा संमिश्र स्वरूपात हा प्रकल्प पुढे नेण्याचे नियोजन आहे.
चित्रीकरण व्हावे
फाळके स्मारकात चित्रपटांचे चित्रीकरण व्हावे तसेच नागरिकांना पर्यटन स्वरूपाचा अनुभव घेता यावा. चित्रनगरीच्या धर्तीवर पर्यटनस्थळ अशा दुहेरी स्वरूपात येथे नागरिकांना आनंद मिळावा ही त्यामागची संकल्पना आहे. येथे चित्रीकरण व्हावे. कलाकारांचा या ठिकाणी राबता वाढावा, अशा पद्धतीचे फाळके स्मारकातील वातावरण तयार करून तशा सुविधा फाळके स्मारकात मिळाल्या तर नागरिकांचा कलदेखील येथे येण्याकडे वाढेल. चित्रपटाची शूटिंग पाहण्यासाठी लोक जातील. यामुळे महसुलातदेखील वाढ होणार आहे. यासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करण्यात आली असून सल्लागार नेमणूक झाल्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे.