esakal | नांदगाव : अतिवृष्टीमुळे शेतातील पिके भुईसपाट; शंभरावर गावांना फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Damage to agricultural crops due to heavy rainfall

नांदगाव : अतिवृष्टीमुळे शेतातील पिके भुईसपाट

sakal_logo
By
शशिकांत पाटील

न्यायडोंगरी (जि. नाशिक) : नांदगाव तालुक्यातील पाचही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असूनसर्वाधिक पाऊस नांदगाव मंडळात १२४.५ मिलिमीटर झालेला आहे. मनमाड मंडळात ६६.५, हिसवळ ८२.५, जातेगाव १०८.८, वेहळगाव ७६.५ एवढा पाऊस झाल्याची नोंद आहे. वरील नोंदी पेक्षाही तालुक्यात अनेक गावात अधिक पाऊस झाल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. तालुक्यातील किमान शंभर गावे बाधित झाली असून २६ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

रांगड्या कांद्याची वाताहत

तालुक्यातील मका, बाजरी, कापूस, कडधान्य व इतर पिकांना या अति पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके तर भुईसपाट झाली आहेत. नव्याने लावलेला खरीप कांदाही वाहून गेला आहे. दसऱ्याला लागवडीसाठी तयार करत असलेल्या रांगड्या कांद्याच्या रोपाची वाताहत झाली आहे.

हेही वाचा: नांदगाव : पुराच्या पाण्याने शहराला वेढले

पंचनामे झाल्यानंतर वास्तविक चित्र स्पष्ट

अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत. अति पावसाने शेतशिवारात पाणी तुंबून पिके नुकसानग्रस्त होत आहेत. त्याचबरोबर रस्त्यांचे व नाला बांधाचे नुकसान झाले आहे. तालुक्याची पावसाची सरासरी ४९२ मिलिमीटर असून आत्तापर्यंत ६८८ मिलिमीटर म्हणजे दीडपट पावसाची नोंद झाली आहे. कृषी अधिकारी जगदीश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तालुक्यातील किमान १०० गावे बाधित असून प्रथमदर्शनी २६ हजार ५९७ हेक्टर क्षेत्र बाधित दिसत आहे, त्यात वाढ होणार असून वास्तविक पंचनामे झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. नांदगाव तालुक्यातील महादेव डोंगररांगेच्या खालील भागातील पिंपरी हवेली, परधाडी, पिंपरी हवेली, न्यायडोंगरी परिसरातील गावांना अतिवृष्टीचा दणका बसला आहे. पर्जन्यनोंदीपेक्षा अधिक पाऊस या परिसरात झाला आहे. न्यायडोंगरीतील देश नदीस तर गेल्या चाळीस वर्षात सर्वाधिक मोठ्या पुराची नोंद झाली आहे. पुराचे पाणी न्यायडोंगरी बाजारपेठेत घुसले, त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: गुजरातला १५ टीएमसी पाणी दिले तरच महाराष्ट्राला निधी

''पीक विमा घेतलेला शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानीबाबत टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२ वर ७२ तासाच्या आत सूचना नोंदवाव्यात. टोल फ्री नंबर लागत नसल्यास एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीचे तालुका प्रतिनिधी प्रीतेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा.'' - जगदीश पाटील, कृषी अधिकारी, नांदगाव.

loading image
go to top