esakal | कळवण : चणकापूर उजव्या कालव्याला भगदाड पडल्याने शेतीचे मोठे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Damage to agriculture due to canal breach

चणकापूर उजव्या कालव्याला भगदाड पडल्याने शेतीचे मोठे नुकसान

sakal_logo
By
रविंद्र पगार

कळवण (जि. नाशिक) : नवी बेज शिवारातील नितीन पगार व बापू आहेर यांच्या घराजवळच चणकापूर उजव्या कालव्याला (Canal) शुक्रवारी (ता. ३) रात्री आठच्या सुमारास भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. शेकडो एकर जमिनीतील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री अचानक आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अनेक घरांत पाणी शिरले. या पिकांचा तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जिवाचे रान करत पिकवलेली पिके नष्ट

यंदा सुरवातीपासूनच पावसाने ओढ घेत शेतकरी बांधवांच्या अडचणी वाढविल्या आहेत. शेतकऱ्यांनी जिवाचे रान करीत पिके कशीबशी जिवंत ठेवली आहेत. पाणीटंचाई ओळखून चणकापूर धरणातून उजव्या कालव्यास पाणी सोडण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास बेज शिवारातील नितीन पगार व बापू आहेर यांच्या घराजवळ कालव्यास भगदाड पडून लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे पाटाखालच्या शेकडो एकर शेतातील उभी पिके वाहून गेली. अतिपाण्यामुळे भाजीपाला पिके वाया गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या कांदाचाळ व घरात पाणी गेले होते. अचानक आलेल्या पाण्यामुळे अंधारात शेतकऱ्यांना स्वतःचे व जनावरांचे प्राण वाचाविण्यासाठी धावपळ करावी लागली.

हेही वाचा: मालेगावात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे महागाई विरोधात आंदोलन

निकृष्ट कामामुळेच मुरतेय पाणी...

उजव्या कालव्याला भगदाड पडल्याने कालव्याचे निकृष्ट काम व दुरुस्तीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण कालव्याची दुरुस्ती करणे गरजेचे असते. मात्र, दर वर्षी थातुरमातुर दुरुस्ती दाखवून लाखो रुपयांची बिले मर्जीतल्या ठेकेदारांच्या नावावर काढली जात असल्याचा आरोप शेतकरी बांधवांनी केला आहे. त्यामुळे निकृष्ट कामांमुळेच पाणी मुरत असल्याचे बोलले जात आहे.

कालव्याला भगदाड पडलेल्या ठिकाणी कालव्यापलीकडच्या डोंगरावरील पाणी वाहून जाण्यासाठी पाटाखालून सिमेंट पाइप टाकण्यात आले आहेत. या पाइपाच्या ठिकाणीच भगदाड पडले. शेतकऱ्यांनी घटनेची माहिती आमदार नितीन पवार यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने शासकीय यंत्रणेला पाहणी करण्यास सांगितले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. कळवणचे तहसीलदार बंडू कापसे, मंडळ अधिकारी वसंत शिरसाठ, तलाठी नवनाथ कुटे, महसूल कर्मचारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले. तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी राजेंद्र शिंदे, गोपाळ शिंदे, दत्तू पगार, अशोक शिंदे, जयेश शिंदे, कल्पना शिंदे, गौरव शिंदे, रत्नाबाई शिंदे, महादू आहेर, रामदास दशपुते, सुरेश शिंदे आदींनी केली.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचे संकेत; महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी

''चणकापूर उजवा कालवा शिव फाटा येथील कालव्याला भगदाड पडल्याने ५० हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. शासन स्तरावर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी.'' - राजेंद्र शिंदे, शेतकरी, कळवण

''नवी बेज शिवारातील माझ्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका, कोबी, सोयाबीन, द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी घुसले आहे. शासनाने या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तत्काळ भरपाई द्यावी.'' - रामकृष्ण पगार, शेतकरी, कळवण

''तीन दिवसांपूर्वी कालव्याला गळती लागली होती. शुक्रवारी दुपारी सिमेंट गोणी टाकून दुरुस्ती केली होती. मात्र, तरीही पाणी न थांबल्याने भगदाड पडले आहे. पाणी बंद करण्यात आले आहे. मातीची भर टाकून दुरुस्ती करून पुन्हा पाणी सोडण्यात येईल.'' - व्ही. ए. टिळे, उपकार्यकारी अभियंता, पुनंद प्रकल्प

loading image
go to top