युरिया टाकल्याने कांद्याने नुकसान; शेतकऱ्यांला बसला आर्थिक फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onions affected by urea

युरिया टाकल्याने कांद्याने नुकसान; शेतकऱ्यांला बसला आर्थिक फटका

जुनी शेमळी (जि. नाशिक) : येथील युवा शेतकरी कैलास रमेश पवार यांनी रामदास धर्डा शेलार यांच्याकडून पाणी घेऊन मोठ्या कष्टाने पिकवलेल्या दोन एकर कांद्यावर अज्ञात व्यक्तीने युरिया (urea) टाकल्यामुळे नुकसान झाले. दोन दिवसांपूर्वी काढलेला कांदा (Onion) शेतातच गोळा करून कांदा पात टाकून झाकलेला होता. अंदाजे १२० ते १५० क्विंटल कांदा असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. (Damage to onions by adding urea Economic crisis to farmer Nashik News)

घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील शेतीत पहिल्यांदाच कांदा लागवड केली. लागवडीच्या सुरवातीलाच मोठ्या प्रतिक्षेनंतर मजूर वर्ग आणून कांदा लागवड केली. वातावरणातील सातत्याने होणारे बदल, बाजार भाव नसल्याने वाढलेली चिंता अशा अनेक संकटांवर मात करत कांदा काढला. परंतु, अज्ञात व्यक्तींनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांदा पिकावर युरिया टाकला. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा व्यक्तींना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

"शेतात पाणी नसल्याने शेतकऱ्याकडून पाणी घेतले. काबाडकष्टातून कांदा पीक काढले. बाजार भाव नसल्याने शेतात कांदा झाकून ठेवला. मात्र, या कांद्यावर अज्ञात समाजकंटकांकडून युरिया टाकण्यात आल्याने मोठे नुकसान झाले." - कैलास पवार, शेतकरी, जुनी शेमळी

"शेतकऱ्याने वेळीच लक्ष दिल्यामुळे हा प्रकार समजला. परंतु, इतर शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याची रोज पाहणी करावी. कृषी विभागाकडून पाहिजे तेवढे सहकार्य शेतकऱ्यांना केले जाईल." - सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकारी, सटाणा