Sarangkheda | मृतदेह शवविच्छेदनासाठी करावी लागते तासनतास प्रतिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृतदेह शवविच्छेदनासाठी करावी लागते तासनतास प्रतिक्षा
मृतदेह शवविच्छेदनासाठी करावी लागते तासनतास प्रतिक्षा

मृतदेह शवविच्छेदनासाठी करावी लागते तासनतास प्रतिक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- सागर शिर्के

सारंगखेडा - येथील आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारीच नसल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी तासन् तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचा अनुभव येत आहे. दुःखाचा डोंगर डोक्यावर असताना नातेवाइकांनाही शवविच्छेदनासाठी डॉक्टर लवकर यावा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांसह पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांची त्वरित नियुक्तीची मागणी होत आहे.

शहादा तालुक्यातील सारंगखेडा हे गाव शहादा-दोंडाईचा या दोन शहरांच्या मध्यभागी आहे. देशभरात अश्व बाजारासाठी प्रसिद्ध असलेली दत्तप्रभूंची यात्रा व चेतक महोत्सवामुळे देश-प्रदेशात प्रसिद्ध सारंगखेडा गावात जुने व परिसरातील मोठे आरोग्य केंद्र आहे. त्यास सहा आरोग्य उपकेंद्र जोडले असून १५ गावांचे कार्यक्षेत्र आहे. त्यात २८ हजारांपेक्षा जास्त लोक आरोग्य सेवेचा लाभ घेतात. त्यात बहुतांशी गावे ही आदिवासीबहुल आहेत. आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे. तरीही बऱ्याच वर्षांपासून आरोग्य केंद्राला पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे. सारंगखेडा गावाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. दररोजची दीडशे ते दोनशे रूग्ण बाह्यरुग्ण कक्षात तपासणीसाठी येतात. प्रसूतीसह, छोटे-मोठे अपघात व पोलिस स्टेशनमधून येणारे आरोपी यांची वैद्यकीय तपासणीही येथेच केली जाते.

हेही वाचा: आयुष्याच्या अमृतमहोत्सवासाठी योगाभ्यास गरजेचा - सूरज मांढरे

मुख्य मार्गावर गाव असल्याने अपघात, घात किंवा हत्या-आत्महत्या यांसह अनेक मृत व्यक्तींना येथे आणले जाते. त्यांचे शवविच्छेदन येथे केले जाते. येथे शवविच्छेदन गृह आहे मात्र पुरेसे कर्मचारी नाहीत. शवविच्छेदनासाठी तज्ञ डॉक्टर नाहीत. त्यामुळे येथील आरोग्य केंद्रात मृतदेह आणल्यावर नंदुरबार किंवा म्हसावद येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करावे लागते. एखाद्या वेळेस ते रजेवर असले किंवा त्यांच्याकडे रुग्णांची गर्दी असली तर ती सेवा पूर्ण करून ते शवविच्छेदनासाठी वेळ देतात. तोपर्यंत मात्र मृतदेह शवविच्छेदनाच्या प्रतिक्षेत असतो. त्यासोबत नातेवाईकही तेथेच गर्दी करून थांबलेले असतात. घात-अपघाताची घटना असल्यास पोलिस यंत्रणाही तेथे अडकून पडलेली असते, असे चित्र आहे. त्यामुळे सारंगखेडा येथे कायमस्वरूपी पात्र वैद्यकीय अधिकारी नेमावा, अशी मागणी सारंगखेडासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीपणा अथवा दुर्लक्षामुळे कायमस्वरूपी वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती होत नाही. आपण वेळोवेळी मागणी करून केवळ आश्‍वासनच मिळते. याकडे प्रशासनाने व पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून वैद्यकिय अधिकाऱींची नियुक्ती करावी.

- जयपाल रावल, माजी उपध्यक्ष जि. प. नंदुरबार

loading image
go to top