आयुष्याच्या अमृतमहोत्सवासाठी योगाभ्यास गरजेचा - सूरज मांढरे | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suraj mandhare

आयुष्याच्या अमृतमहोत्सवासाठी योगाभ्यास गरजेचा - सूरज मांढरे

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

नाशिक : स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहोत, मात्र हा आनंद केवळ एखाद्या समारंभापुरता मर्यादित न ठेवता त्यातून प्रत्येकाच्या आयुष्यात अमृतमहोत्सवी जगण्याचा आनंद घेण्यासाठी योगाभ्यास गरजेचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या आवारातील हिरवळीवर 'आजादी का अमृत महोत्सव' अंतर्गत आयोजित योगासनांच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आयुष्यभरासाठी काही तरी वेगळं करण्याचा संकल्प करावा म्हणून योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात योग खूप गरजेचा आहे. आपण जर नियमितपणे योगाभ्यास केला, तर प्रत्येक जण स्वतःच्या अमृतमहोत्सवापर्यंत निरोगी राहील. योग अभ्यास यासारखे कार्यक्रम आयोजित केल्यास त्याचे दूरगामी फायदे दिसून येतील व योगाभ्यास प्रत्येक माणसाला तणावमुक्तीच्या दिशेने घेऊन जाईल, असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: नाशिक : महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

योग अभ्यासक प्रज्ञा पाटील यांनी यावेळी योगातील विविध आसने व त्यांचे होणारे फायदे यांची माहिती देऊन निरोगी आयुष्यासाठी योगासनांचे महत्व विषद केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील हिरवळीवर पहाटेच्या थंडीत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी या अभ्यासवर्गात सहभाग घेतला प्रज्ञा पाटील यांनी विविध योगासने आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील फायदे याबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली. तसेच दिवसभरात जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्राणायाम कसा करावा आणि त्याचा आपल्याला काय फायदा होतो याबाबतही मार्गदर्शन केले सुमारे तासभर हा योगाभ्यास सुरू होता सतत कामाच्या व्यापात आणि धावपळीचे आयुष्य जगणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने व गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड विजेत्या प्रज्ञा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि BLVD ग्रुपच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. आभार उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी मानले.

हेही वाचा: ऋणातून मुक्त होण्याच्या भावनेतून गाईचे उत्तरकार्य

यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भिमराज दराडे, उपजिल्हाधिकारी प्रकाश थविल, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी स्वाती थविल, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

loading image
go to top