
पक्षनिष्ठा की मित्रप्रेम; कृषीमंत्री दादा भुसेंसमोर धर्मसंकट
मालेगाव (जि. नाशिक) : शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) काय निर्णय घेणार या विषयी मतदार संघासह जिल्ह्यात उत्सुकता आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरीत होवून शिवसेनेच्या मुशीत वाढलेल्या श्री. भुसे यांचे श्री. शिंदे यांच्याशी मैत्रिपूर्ण संबंध सर्वश्रूत आहेत. यातच ठाणे येथील खासदार राजन विचारे हे भुसे यांचे व्याही झाल्यानंतर या मैत्रीला चारचॉंद लागले. त्या पाश्र्वभूमीवर पक्षनिष्ठा की मित्रप्रेम हा निर्णय घेणे म्हणजे भुसे यांच्यासमोर मोठे धर्मसंकट आहे. (decision of Dada Bhuse will take after revolt of senior Shiv Sena leader and Urban Development Minister Eknath Shinde nashik news)
श्री. शिंदे यांच्या बंडाचे वृत्त आज सकाळी प्रसार माध्यमात झळकल्यानंतर शहरातही जोरदार चर्चा सुरु झाली. इलेक्ट्रॉनिक मिडीयाने नेहमीप्रमाणे शहनिशा न करता श्री. भुसे नॉट रिचेबल या आशयाचे वृत्त दाखविण्यास सुरुवात केली. सकाळी श्री. भुसे आपल्या शासकीय निवासस्थानी होते. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीसही ते उपस्थित होते. याच दरम्यान श्री. भुसे, माजीमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंञ्यांना श्री. शिंदे यांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. या संदर्भात ‘सकाळ’ने भुसे यांच्याशी संपर्क केला असता मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. प्रस्ताव घेऊन जाण्याएवढा मोठा नेता नाही.
तुर्त या प्रश्नी प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही असे सांगितले. शहर व तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्येही चलबिचल होती. दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. जिल्हयातील शिवसेनेचे दुसरे आमदार सुहास कांदे यांचेही मातोश्री, उध्दव ठाकरे, त्यांचे सचिव मिलींद नार्वेकर व पक्षाचे नेते संजय राऊत यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. तुर्त श्री. कांदेही नॉट रिचेबल असून शिंदे यांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे. यामुळे मालेगाव व नांदगाव विधानसभा मतदारसंघाकडे अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत श्री. भुसे यांच्यासाठी शहरात तीन वेळा भेटी दिल्या. दोनदा विविध विकास कामांसाठी तर एकवेळा श्री. भुसे यांचे पुत्र युवासेनेचे संघटक अविष्कार यांच्या विवाह सोहळ्यासाठी त्यांनी येथे हजेरी लावली. गेल्या महिन्यातच शिंदे यांच्या पुढाकारातून शहरातील विविध रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागातर्फे श्री. भुसे यांनी मिळवून आणला. श्री. शिंदे, खासदार विचारे यांचे अतिशय सलोख्याचे व घरोब्याचे संबंध आहेत. ठाणे जिल्हयात शिवसेना वाढविण्यात दोघांचा सिंहाचा वाटा आहे. श्री. शिंदे हे मित्र म्हणून श्री. भुसे यांना जवळचे आहेत.
दुसरीकडे पक्ष नेतृत्वाने अतिशय अटीतटीच्या वेळेत कृषीमंत्री पदाची जबाबदारी सोपवून भुसे यांच्यावर विश्वास दाखविला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व युवानेते आदित्य ठाकरे यांच्याशीही भुसे यांची जवळीक आहे. भुसे यांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराला आदित्य ठाकरे मालेगाव दाैऱ्यावर आले होते. युवानेते आदित्य यांच्याशी अविष्कार भुसे यांचे संबंधही सर्वश्रृत आहेत. ही परिस्थिती पाहता श्री. भुसे यांना इकडे आड तिकडे विहिर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या धर्मसंकटावर ते कशा पध्दतीने मात करणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.