
Nashik Smart City Work : जलशुद्धीकरण विस्तारीकरण प्रकल्पांना विलंब; अटी व शर्ती बदलण्याचे प्रयत्न
Nashik News : स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून पंचवटी व बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
परंतु संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देऊन १३ महिने उलटले तरी अद्यापही पूर्ण क्षमेतेने काम सुरू झालेले नाही. (Delays in water treatment expansion projects Attempts by Smart City company to change terms and conditions nashik news)
त्यामुळे उर्वरित १७ महिन्यांमध्ये विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी कराराच्या अटी व शर्तींमध्ये बदल केले जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून शहरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहे. सध्या गावठाण पुनर्विकासअंतर्गत गावठाण भागात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
मात्र, जवळपास ५० टक्के कामे अद्यापही अपूर्ण आहेत. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये पंचवटी व बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्तारीकरणासाठी स्मार्टसिटी कंपनीने विश्वराज एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काम दिले. जवळपास पावणेदोनशे कोटी रुपयांची हे काम असून कार्यारंभ आदेश दिल्यापासून ३० महिन्यात हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.
करारात तशी अटदेखील टाकण्यात आली आहे. परंतु, आत्तापर्यंत प्रशासकीय इमारत उभारण्यापर्यंतच काम झालेले आहे. उर्वरित काम करताना स्मार्टसिटी कंपनीला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पावसाळ्याचे चार महिने काम बंद ठेवावे लागणार आहे, तर पंचवटी व जुने नाशिक भागातील पाणीपुरवठा खंडित न करता जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम मार्गी लावावे लागणार आहे. ३० महिन्यात काम पूर्ण करायचे आहे.
कार्यारंभ आदेश देऊन १३ महिने झाले उर्वरित १७ महिन्यात काम होईल की नाही, याबाबत स्मार्टसिटी कंपनीसह संबंधित ठेकेदार कंपनीदेखील साशंक आहे. त्यामुळे करारातील अटी व शर्ती बदलण्याची तयारी सुरू झाली आहे.
साहित्य बदलणार
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कमी कालावधी असल्याने करारात नमूद केलेल्या साहित्याऐवजी अन्य साहित्याचे नाव टाकून ते प्रकल्प विस्तारीकरणासाठी वापरले जाणार असल्याचे बोलले जात आहे. यातून नवीन यंत्रणा किंवा साहित्य तयार करण्यासाठी लागणारा वेळ वाया जाणार आहे, मात्र यातून गुणवत्तेचादेखील प्रश्न निर्माण होणार आहे.
"पंचवटी व बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्तारीकरण कामा संदर्भातील अटी व शर्ती मध्ये कुठलाही बदल होणार नाही. स्मार्ट सिटी कंपनीच्या कामात व्यत्यय येऊ देणारी नाही."
- सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी.