
नाशिक : शहर- परीसरातील दुचाकी, चारचाकी वाहनांची दालने मंगळवारी (ता. ३) सकाळपासून ग्राहकांनी गजबजले होते. अक्षयतृतीया मुहूर्तानिमित्त ऑटोमोबाईल क्षेत्रात चैतन्याचे वातावरण बघायला मिळाले. वाहन खरेदीतून सुमारे पंचवीस कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल राहिला.
गेल्या काही दिवसांपासून कंपन्यांच्या दालनात ग्राहकांची रेलचेल बघायला मिळत होती. अशात अक्षयतृतीयाचा मुहूर्त साधत अनेकांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत वाहन घरी नेले. विशेषतः चारचाकी वाहनांच्या (vehicles) खरेदीचा जोर अधिक बघायला मिळाला. वेगवेगळ्या श्रेणीतील वाहन खरेदीला प्रतिसाद मिळाला. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे अनेक ग्राहकांनी सीएनजी (CNG) किट असलेले किंवा इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीवर भर दिल्याचेही बघायला मिळाले.
पूजा विधीची सुविधा, सेल्फीसाठी धडपड
बहुतांश दालनांमध्ये वाहन खरेदीसोबत फुलांचा हार उपलब्ध केला होता. सोबत पूजा करण्यासाठीची व्यवस्था केलेली होती. तोंड गोड करण्यासाठी पेढादेखील उपलब्ध केला होता. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्राहक व त्यांच्या कुटुंबियांकडून वाहनासोबत सेल्फी टिपतांना धडपड बघायला मिळाली.
अभिनेता चिन्मयने साधला मूहूर्त
अक्षयतृतीयानिमित्त अभिनेता चिन्मय उदगीरकर व गिरीजा जोशी- उदगीरकर यांनीदेखील वाहन खरेदीचा मुहूर्त साधला. दालनात चिन्मयला बघून उपस्थितांना त्याच्यासोबत सेल्फी, छायाचित्र टिपण्याचा मोह आवरला नाही.
"अक्षयतृतीयानिमित्त वाहन खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पेट्रोल, डिझेलच्या वाहनांसोबत इलेक्ट्रिक वाहन, सीएनजी वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल राहिला."
-नूतन चव्हाण, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर, स्टेरलिंग मोटर्स