
Nashik : कुठे धो-धो, तर कुठे टँकरने पाणीपुरवठा!
पंचवटी (जि. नाशिक) : परिसरातील काही भागात धो-धो, तर काही ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी चक्क टँकरने (Water Tanker) पाणीपुरवठा सुरू असल्याचे चित्र आहे. आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद येथेही हीच परिस्थिती असल्याचे अनेकांनी सांगितले. (Despite having adequate reserves in dam shortage of water in city Nashik News)
गतवर्षी समाधानकारक पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात अद्यापही पावसाळ्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात. दुसरीकडे अनेक भागात नळाला पाणीच येत नसल्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात पंचवटीतील गावठाण भागासह, म्हसरूळ, आडगाव शिवारात पाणीच येत नसल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. आज शहराचा सर्वदूर विस्तार झालेला असलातरी मूळ शहर हे टेकड्यांवर वसलेले आहे. त्यामुळे काही भाग उंच तर काही भाग खोलगट भागात आहे. त्यातच गावठाणातही आता उंच इमारती उभ्या राहू लागल्याने विद्युत मोटारींचा वापरही अपरिहार्य झाला आहे. याचा परिणाम उंच भागातील पाणीपुरवठ्यावर होत आहे.
या भागात अल्प पाणीपुरवठा
गणेशवाडी परिसरातील मुंजोबा चौकातील हरिहरेश्वर, हरिचरण सोसायटीत गेल्या पंधरा दिवसांपासून अतिशय अल्पदराने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी तेथील रहिवाशांनी केल्या आहेत. या दोन्ही सोसायट्यांमध्ये जवळपास ६४ फ्लॅट धारक वास्तव्यास असून, पंधरा दिवसांपासून नळाला पाणीच येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी टँकर सुरू आहे. परंतु, टँकर आल्यावर लगेच खाली होत असल्याने त्याऐवजी नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
हेही वाचा: नाशिक : मानपानावरून छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
म्हसरूळ, आडगावात वणवण
महापालिकेत समाविष्ट झालेल्या खेड्यांपैकी सर्वाधिक लोकवस्तीचे गाव म्हणून आडगावची ओळख आहे. या ठिकाणी पिंप्री रोड, मळेवस्तीत नियमित पाणीपुरवठा होत नाही, तर गावाच्या काही भागात धो- धो पाणी वाहत असल्याचे दिसून आले. म्हसरूळ परिसरातील किशोर सूर्यवंशी मार्गावरील अनेक सोसायट्यांमध्ये भल्या पहाटे म्हणजे तीन साडेतीनलाच पाणी येत असल्याचे काही महिलांनी सांगितले.
हेही वाचा: Nashik : द्राक्षनगरीत खाल्ला जातो दररोज 5 टन आंबा
"गेल्या आठ दहा दिवसांपासून नळाला पाणीच येत नसल्याने सोसायटीची टाकी रिकामीच राहाते. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या मार्फत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे."
- बबलू फलटणे, व्यावसायिक.
"गेल्या काही दिवसांपासून नळाला पाणीच येत नसल्याने मिळेल तेथून पाणी भरावे लागते. एकीकडे पाण्याचा सडा तर दुसरीकडे टँकर मागवावा लागत आहे, हे चित्र बदलणे गरजेचे."
- साधना आहिरे, गृहिणी.
Web Title: Despite Having Adequate Reserves In Dam Shortage Of Water In City Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..