Nashik Crime News : झोपेत पत्नीची हत्त्या करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने ठोठावली जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Husband sentenced to life imprisonment for wife's murder

Nashik Crime News : झोपेत पत्नीची हत्त्या करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने ठोठावली जन्मठेप

नाशिक : ‘मला तु आवडत नाहीस’, असे म्हणत झोपेत असलेल्या 26 वर्षीय पत्नीच्या डोक्यात फावड्याने मारून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. राठी यांनी ही शिक्षा सुनावली.

हिरामण निवृत्ती बेंडकुळे (30, रा. जयभवानी वस्ती, नाणेगाव, देवळाली कॅम्प) असे आरोपी पतीचे नाव आहे. सदरची घटना 25 जानेवारी 2020 रोजी जयभवानी वस्तीवर घडली होती. दोन वर्षांत या खटल्याची जलदगतीने सुनावणी पूर्ण करीत न्यायालयाने निकाल दिला. (district court sentenced man who killed his wife in her sleep to life imprisonment Nashik Crime News)

काजल हिरामण बेंडकुळे (२६) असे मयत विवाहितेचे नाव आहे. फिर्यादीनुसार, काजल हिचा विवाह होताच १० ते १२ दिवसात आरोपी हिरामण याने तिच्याशी भांडण करुन तिला माहेरी काढून दिले होते. त्याबाबत काजलच्या आई-वडिलांनी हिरामणला विचारणा करताच त्याने ‘काजल आवडत नाही’ असे सांगितले होते.

दरम्यान, काजलची सासू कल्पना बेंडकुळे यांनी लग्नाच्या दोन महिन्यांनंतर काजल हिला पुन्हा नांदविण्यासाठी नाणेगावी सासरी आणले होते. त्यानंतर हिरामण याने काजलला काही-ना-काही कारणातून मारहाण करीत होता. त्याच्या आईला तो मारायचा.

दरम्यान २५ जानेवारी २०२० रोजी रात्री सात वाजता हिरामण घरी आला आणि पुन्हा काजलशी वाद घातला. त्यानंतर तो झोपी गेला. काजलने काही वेळानंतर त्याला जेवण करण्यासाठी उठविले असता त्याला राग आला. त्याने पुन्हा शिवीगाळ केली. यानंतर काजल चार वर्षीय मुलगी वैष्णवी व दोन वर्षीय मुलगा वैभवला घेऊन घरातील किचनमध्ये झोपण्यासाठी गेली.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: Nashik Crime News : घराचे आमिष दाखवून भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार

रात्री दहा वाजता हिरामणने घराच्या पडवीतून फावडे आणून किचनमध्ये जात काजलच्या डोक्यात ५ ते ६ वेळेस प्रहार केला. त्यात ती जागीच ठार झाली. याप्रकरणी देवळाली कँम्प पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन, हिरामणला अटक करण्यात आली होती. तपासाधिकारी तथा सहायक निरीक्षक आर. टी. मोरे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोप दाखल केले.

त्यात सहायक सरकारी अभियोक्ता योगेश कापसे यांनी न्यायालयात 13 साक्षीदार तपासले. न्या. राठी यांनी पुरावे व साक्षींच्या आधारे आरोपी हिरामण यास जन्मठेप व २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक जे.व्ही. गुळवे, हवालदार डी.बी. खैरनार यांनी पाठपुरावा केला.

हेही वाचा: Nashik Crime News : 50 लाख उकळूनही सावकाराकडून 20 लाखांची मागणी; गुन्हा दाखल