Latest Marathi News | मागणी वाढल्याने सर्वच प्रकारच्या फुलांच्या दरांत तेजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival News

Diwali Festival : मागणी वाढल्याने सर्वच प्रकारच्या फुलांच्या दरांत तेजी

नाशिक : सोमवारच्या लक्ष्मीपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर गंगाघाटावरील फूल बाजारात झेंडूसह सर्व प्रकारच्या फुलांच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने इतर पिकांबरोबरच फूल शेतीचेही मोठे नुकसान झाल्याने आवकेत मोठी घट झाल्याने यंदाच्या दिवाळीत दसऱ्यासारखेच झेंडूचे दर तेजीतच राहण्याची शक्यता आहे.

हिंदू धर्मियांत दसरा आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांना मोठे महत्त्व आहे. या काळातील मागणी लक्षात घेऊन नाशिकसह दिंडोरी, निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती केली जाते. याशिवाय शेजारच्या नगर जिल्ह्यातूनही नाशिकमध्ये फुलांची मोठी आवक होते.(Diwali Festival Due to increase in demand prices hike of all types of flowers blooming Jalgaon News)

हेही वाचा: Bank Holiday During Diwali : सणासुदीच्या धामधुमीत बँकांना टाळे!

यंदा परतीच्या पावसाने दाणादाण उडविल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे आवकेत मोठी घट झाली आहे. मात्र, आवकेत घट होऊनही मागणीत मोठी वाढ झाल्याने एरवी पन्नास ते साठ रूपयांत मिळणाऱ्या फुलांच्या जाळीसाठी शनिवारी दोनशे ते अडीचशे रुपये मोजावे लागले. तर शेवंती, लिली, अस्टरच्या दरांतही मोठी वाढ झाली.

गुलाबाच्या दरांतही वाढ

सर्वसाधारण परिस्थितीत दहा रूपयांत उपलब्ध होणाऱ्या गुलाबाच्या फुलांच्या जुडीच्या दरांतही दुप्पट वाढ झाली. त्यामुळे गुलाबाच्या सफारी हारासाठी चक्क दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत होते. दसरा, दीपावलीच्या काळात चारचाकी वाहनांच्या मागणीतही मोठी वाढ होत असल्याने अनेकांची पसंती गुलाबाच्या फुलांच्या हाराला असते. मागणीच्या तुलनेत गुलाबाची फुले उपलब्ध होत नसल्याने गुलाबाच्या हाराच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय एरवी वीस रूपयांत उपलब्ध असणारा फुलांच्या हारांसाठीही चाळीस ते पन्नास रुपये मोजावे लागत होते.

हेही वाचा: NMC Night Cleanliness Drive : शहरात दिवाळीत रात्रीचीही स्वच्छता

वाहतुकीची कोंडी कायमच

गणेशवाडीतील फूल बाजार रस्त्यावरच भरतो. आडगाव नाका ते नेहरू चौक हा वर्दळीचा रस्ता असून, या ठिकाणी नेहमीच वाहनांची गर्दी असते. सकाळ, सायंकाळी गर्दीत मोठी वाढ होते, मात्र सकाळी हा बाजार भरत असल्याने स्कूल बस, रिक्षाचालक, चारचाकी वाहनधारक यांना वाहतूक कोंडीचा नेहमीच सामना करावा लागतो.

"पावसामुळे सर्वच प्रकारच्या फुलांच्या आवकेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे सुट्या फुलांबरोबरच सर्वच प्रकारच्या हारांच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे."

- गणेश गरकळ, फूल विक्रेता

"इतर पिकांबरोबरच यंदा फूल शेतीचे पावसाने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फुलांच्या दरांत या वर्षी थोडी वाढ झाल्याने बळीराजाचे नुकसान भरून निघण्याची शक्यता आहे."

- विनायक जेजुरकर, फूल उत्पादक शेतकरी

हेही वाचा: Diwali Update : बाजारपेठांमधील गर्दीने वाहतूक कोंडी