भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा दिवाळी स्नेहमिलन उत्साहात संपन्न

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा दिवाळी स्नेहमिलन उत्साहात संपन्न
Published on: 
फोटो : A15233 नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे हुतात्मा स्मारकात दिवाळी स्नेहमिलन सोहळ्यास उपस्थित मान्यवर. -- कष्टकरी जनतेच्या एकजुटीचा संदेश ‘भाकप’चा दिवाळी स्नेहमिलन सोहळा उत्साहात सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. १५ : भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित ‘दिवाळी स्नेहमिलन २०२६’ कार्यक्रम शनिवारी (ता. १४) सायंकाळी हुतात्मा स्मारकात उत्साहात पार पडला. बळीराजाच्या सन्मानाचा आणि कष्टकरी जनतेच्या एकजुटीचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात विविध राजकीय पक्ष, सामाजिक व कामगार संघटनांचे प्रतिनिधी, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकशाही, संविधानिक मूल्ये, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि बंधुभाव जपणाऱ्या विविध संघटना व व्यक्तींमध्ये परस्पर संवाद वाढावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीनिमित्त सदिच्छांची देवाणघेवाण, फराळाचा आस्वाद आणि गाण्यांच्या मैफलीमुळे कार्यक्रमाला कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले होते. समता व लोककल्याणाचे प्रतीक असलेल्या बळीराजाचा आणि समाजाचे अर्थकारण उभारणाऱ्या कष्टकऱ्यांचा सन्मान राखत, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी एकजूट मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) तर्फे दुष्काळग्रस्त व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त आर्थिक सहकार्य केले. कार्यक्रमास भाकपचे राज्य सहसचिव राजू देसले, जिल्हा सचिव मनोहर पगारे, ज्येष्ठ नेते ॲड. दत्ता निकम, व्ही. डी. धनवटे, माकपचे डॉ. डी. एल. कराड, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू खैरे, स्वातंत्र्यसैनिक समितीचे विजय राऊत, कामगार नेते महादेव खुडे, मिनाज मिर्झा, अजमल खान, संतोष जाधव, डॉ. सहित, डॉ. डी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, ॲड. प्रभाकर वायचळे, सोमा कुराडे, नीलिमा साठे, ॲड. दत्ता बोडके, भारती जाधव, कांचन पवार आदी उपस्थित होते. संयोजनासाठी राज्य कौन्सिल सदस्य प्राजक्ता कापडणे, भीमा पाटील, शहर सचिव तल्हा शेख, सहसचिव मीना आढाव, पद्माकर इंगळे, अमोल लोणारी यांनी परिश्रम घेतले.