नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती. 

new strain.jpg
new strain.jpg

नाशिक : जगातील ६० देशांमध्ये कोरोनाचा नवीन युरोपियन स्ट्रेन पसरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. हाच कोरोनाचा युरोपियन स्ट्रेन नाशिकमध्ये आढळला आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला (एनआयव्ही) गेल्या महिन्यातील पाठवलेल्या आठ नमुन्यांतील सहा नमुन्यांमध्ये युरोपियन स्ट्रेन आढळला आहे. हे नमुने सिन्नर आणि मालेगावमधील आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमागील कारण त्यातून स्पष्ट होण्यास मदत झाली आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजारांच्या पुढे पोचली असून, अशीच रुग्णसंख्या आणखी तीन दिवस वाढत राहिल्यास लॉकडाउनचा विचार प्रशासनाला करावा लागणार, असे दिसते. 

भारतात युरोपियन स्ट्रेन दुबईमार्गे पोचल्याचा अंदाज
शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या डिसेंबर २०२० नंतर १२ फेब्रुवारीपर्यंत कमी होत गेली होती. मात्र कोरोना रुग्ण संख्या वाढत चालल्यापासून ‘क्लस्टर सॅम्पल' पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातील जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले. आठ रुग्णांपैकी सहा रुग्णांमध्ये युरोपियन स्ट्रेन असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन पॉझिटिव्ह रुग्ण भारतीय स्ट्रेन असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा प्रयोगशाळांचे नोडल अधिकारी डॉ. दुधाडिया यांनी ‘सकाळ'ला दिली. दरम्यान, भारतात युरोपियन स्ट्रेन दुबईमार्गे पोचल्याचा अंदाज आरोग्य यंत्रणेचा आहे. 

काय आहे बी.१.१.७ स्ट्रेन;  डॉ. विक्रांत जाधव सांगतात...
युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिस्टलने १० मार्चला ब्रिटिश मेडिकल जर्नल सादर केले आहे. त्यामध्ये युरोपियन बी.१.१.७ स्ट्रेनबद्दलची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पूर्वीच्या स्ट्रेनच्या तुलनेत या स्ट्रेन ३० ते १०० टक्क्यांनी वेदनादायी आहे. नवीन स्ट्रेन वेगाने पसरतो. नवीन स्ट्रेनमुळे कोरोनाची लागण तरुणांमध्ये अधिक आहे. सप्टेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा इंग्लंडमध्ये आढळला. सिंगापूरमध्ये डिसेंबरमध्ये पहिल्यांदा आढळून आला. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत आठ देशांमध्ये स्ट्रेनचा प्रसार झाला आहे. नेमक्या याच कालावधीत आपल्याकडील रुग्णसंख्या कमी झाली होती. शास्त्रज्ञांच्या संशोधनामध्ये ५४ हजार ९०६ रुग्णांच्या तपासणीत नवीन स्ट्रेनने २२७ मृत्यू झाल्याचे आढळून आले. एवढ्या रुग्णांमध्ये पूर्वीच्या स्ट्रेनने १४१ मृत्यू झालेले होते. नवीन स्ट्रेन आढळला तोपर्यंत पूर्वीच्या स्ट्रेनमध्ये २३ वेळा बदल झाल्याचे दक्षिण आफ्रिकेतील संशोधनातून पुढे आले. पूर्वीच्या स्ट्रेनप्रमाणे आताच्याही नवीन स्ट्रेनमुळे शरीरावर होणारे परिणाम सारखे दिसतात. -  डॉ. विक्रांत जाधव


मृत्यू कमी; पण प्रसार वेगाने 
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर युरोपियन स्ट्रेनमुळे मृत्यू कमी असले, तरीही प्रसार वेगाने होत असल्याची माहिती दिली. पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेकडे पाठवलेल्या २६ नमुन्यांमध्ये ३० टक्के नमुन्यांमध्ये युरोपियन स्ट्रेन आढळल्याचे स्पष्ट करण्यात आले. सद्यःस्थितीत आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये ८० टक्के रुग्ण नाशिक शहरातील, तर १८ टक्के रुग्ण ग्रामीण भागातील असल्याची माहिती देण्यात आली. मार्च २०२० पासून आतापर्यंत पाच लाख ९३ हजार २९६ स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये एक लाख ३८ हजार ४६६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण २३.७० टक्के राहिले असून, दोन हजार १९३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा दर १.६ टक्के राहिला असून, सव्वालाखाहून अधिक रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुक्तीचा दर ९०.५८ टक्के इतका राहिला आहे. 


व्हेटिंलेटरवरील रुग्णसंख्येत वाढ 
शहर आणि जिल्ह्यातील लक्षणे असलेल्या आणि नसलेल्या रुग्णसंख्येपासून ते व्हेटिंलेटरचा वापर करावा लागणाऱ्या आणि ऑक्सिजनची आवश्‍यकता भासलेल्या रुग्णांची १६ सप्टेंबर २०२० आणि आजच्या स्थितीचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर सप्टेंबरच्या तुलनेत आता व्हेटिंलेटरवरील रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. मात्र दुसरीकडे ऑक्सिजनची आवश्‍यकता असलेल्या रुग्णसंख्येत जवळपास निम्म्याने घट झाली आहे. १६ सप्टेंबर २०२० मध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी लक्षणे आढळलेल्या रुग्णांचे प्रमाण २८.२७ टक्के म्हणजे दोन हजार ९६२, तर लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ७१.७२ टक्के म्हणजे, सात हजार ५१४ इतकी होती. १३९ म्हणजेच, १.३२ टक्के रुग्णांना व्हेटिंलेटरची आणि एक हजार १७४ म्हणजेच, ११.२० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्‍यकता भासली होती. आज एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी दोन हजार १४६ म्हणजेच, १९.७७ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे आढळली असून, आठ हजार ७०५ म्हणजेच, ८०.२२ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. १५३ म्हणजेच, १.४१ टक्के रुग्ण व्हेटिंलेटरवर, तर ६१५ म्हणजेच, ५.६६ टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. ग्रामीण भागात बहुतांश तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन अंकी झाली आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत निघाला आहे, हे दिसून येते. तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अशी : नाशिक शहर-९ हजार १६७, मालेगाव शहर-८११, नाशिक-२८७, बागलाण-९७, चांदवड-१६३, देवळा-१११, दिंडोरी-११७, इगतपुरी-८७, कळवण-६८, मालेगाव-१९६, नांदगाव-४०९, निफाड-३१२, पेठ-१, सिन्नर-२३३, सुरगाणा-११, त्र्यंबकेश्‍वर-८१, येवला-११३. 

महिनानिहाय कोरोनाविषयक स्थिती 
महिना तपासलेले स्वॅब पॉझिटिव्हिटीची टक्केवारी मृत्यूची टक्केवारी 

मार्च २०२० ३१४ ०.३२ ० 
एप्रिल २०२० २ हजार ४०३ ११.६५ ४.३ 
मे २०२० ८ हजार ८७४ १०.३९ ६.५ 
जून २०२० १० हजार ५५ २८.९५ ५.७ 
जुलै २०२० ३२ हजार ९०४ ३१.३१ २.५ 
ऑगस्ट २०२० ७६ हजार ३१० ३०.१० १.६ 
सप्टेंबर २०२० १ लाख ३६ हजार ५८० २८.१८ १.३ 
ऑक्टोंबर २०२० ६५ हजार ६५० २७.११ १.७ 
नोव्हेंबर २०२० ४८ हजार २३३ १५.४८ १.६ 
डिसेंबर २०२० ५५ हजार ४५३ १६.२० २ 
जानेवारी २०२१ ६२ हजार ३१४ ९.१४ १.५ 
फेब्रुवारी २०२१ ४३ हजार ३६२ १६.१३ ०.८ 
मार्च २०२१ ५० हजार ८४४ ३०.७९ ०.५  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com