esakal | डॉक्टर म्हणताहेत..!"नाशिक-नगरची झंझट नको, आम्हाला ऑक्सिजन द्या"

बोलून बातमी शोधा

doctor
डॉक्टर म्हणताहेत..!"नाशिक-नगरची झंझट नको, आम्हाला ऑक्सिजन द्या"
sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : ऑक्सिजनचा तुटवडा का? तर म्हणे, कोट्याचा प्रश्‍न. त्यामुळे शहरातील वैतागलेल्या खासगी डॉक्टरांनी आम्हाला नाशिक-नगरची झंझट नकोय, आम्हाला ऑक्सिजन द्या, अशी आग्रही मागणी करण्यास सुरवात केलीय. ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या पार्श्‍वभूमीवर संगमनेरच्या ऑक्सिजन उत्पादकांनी जिल्हाबंदीचे कारण पुढे करण्यास सुरवात केली. आता पुरवठ्यासाठी परवानगी आहे म्हटल्यावर नाशिकच्या रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरविण्यासाठी कोट्यावर उत्पादकांचे घोडे अडकलंय.

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर

संगमनेरचे उत्पादक पुरवठ्याला तयार; पण कोट्यावर अडकले घोडे

संगमनेरच्या ऑक्सिजन उत्पादकांकडून शहरातील जवळपास ३० रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्‍न तयार झाला आणि तेथून खऱ्या अर्थाने ऑक्सिजनची धावाधाव वाढली. एवढेच नव्हे, तर ऑक्सिजनअभावी रुग्णांना इतर रुग्णालयांत हलविण्याची वेळ आली. शिवाय नाशिकच्या ऑक्सिजन उत्पादकांवर शहरातील रुग्णालयांना कोठून ऑक्सिजन उपलब्ध करून द्यायचा, असा प्रश्‍न भेडसावू लागला. ऑक्सिजन उपलब्धतेचे व्यस्त प्रमाण राजकारण्यांच्या घोषणांमागून होणाऱ्या घोषणांनंतरही मिटायला तयार नसल्याने संगमनेरकडे डॉक्टरांनी प्रयत्न सुरू केले. आता संगमेनरचे ऑक्सिजन उत्पादक म्हणताहेत, की नाशिकच्या रुग्णालयांसाठी मी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी तयार आहे; परंतु त्यासाठी लिक्विड ऑक्सिजनचा कोटा नाशिकमधून मिळायला हवा. त्यावर काय करायचे, असा प्रश्‍न तयार झाल्यावर ही बाब जिल्हा प्रशासनाला माहिती नाही काय, अशी विचारणा केल्यावर आयएमएच्या डॉक्टरांनी ही बाब जिल्हा प्रशासनाला ठाऊक असल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासनाने संगमनेरच्या उत्पादकांचा तिढा सोडविल्यास शहरातील किमान ३० रुग्णालयांना ऑक्सिजन उपलब्धतेचा प्रश्‍न सुटून शहरातील ताण कमी होण्यास मदत होणार आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: दोन तासांत शुभमंगल! कोरोनामुळे झटपट विवाहाचा ट्रेंड

रात्री पुन्हा पहिले पाढे पंच्चावन्न

खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांची ऑक्सिजनसाठी धावपळ चाललीय. नेमक्या कोणत्या उत्पादकाच्या दारात गाड्या उभ्या करायच्या, असा प्रश्‍न डॉक्टरांपुढे ‘आ’ वासून उभा ठाकला आहे. त्यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी प्रशासनाने आम्हाला कोणाकडून ऑक्सिजन घ्यायचा हे ठरवून द्यावे, म्हणजे गाड्या घेऊन त्यांच्याकडे जाता येईल, अशी मागणी केली. त्याचक्षणी उत्पादकांनी डॉक्टरांकडून ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी साडेसात लाख रुपयांपासून दहा लाख रुपयांपर्यंतचा ॲडव्हान्स घेतल्याची बाब लपून राहिली नाही. शेवटी रात्री पुन्हा ऑक्सिजन पुरवठ्याचे पहिले पाढे पंच्चावन्न राहिलेत.