esakal | दोन तासांत शुभमंगल! कोरोनामुळे झटपट विवाहाचा ट्रेंड
sakal

बोलून बातमी शोधा

wedding

दोन तासांत शुभमंगल! कोरोनामुळे झटपट विवाहाचा ट्रेंड

sakal_logo
By
दीपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : धुमधडाक्यात, वाजतगाजत विवाहाचे बार उडविण्याला कोरोनाने आडकाठी आणली आहे. त्यामुळे यंदा कर्तव्य असणारे वधू-वर साध्या पद्धतीने साता जन्माची गाठ बांधत आहे. ही रेशमीगाठ बांधताना ना वाजंत्री, ना मंडप, ना वऱ्हाडाची गर्दी, ना दिवसभर धार्मिक विधी. तास-दोन तासांत दहा-वीस लोकांच्या उपस्थितीत वर-वधू एकमेकांच्या गळ्यात हार घालून मोकळे होत आहेत. सध्या असा झटपट विवाहाचा ट्रेंड सुरू आहे.

कोरोनामुळे झटपट विवाहाचा ट्रेंड

कोरोनात वधू-वरांच्या आई-वडिलांसाठी कळीचा असलेला पैशांचा मुद्दा जवळजवळ निकाली निघाला आहे. अत्यंत कमी खर्चात आणि झटपट विवाह सोहळे होत आहेत. विवाहातील अनावश्‍यक खर्च, चंगळवाद याला फाटा दिला जात असल्याने मंडप डेकोरेटर, केटरर्स, बॅन्ड पथक आदी व्यावसायिकांचे मात्र कंबरडे मोडले आहे. छायाचित्रकार, मंगल कार्यालये, घोडेवाले यांच्या हातचे काम गेले आहे. पाहुण्यांची बडदास्त ठेवण्याची कटकटही कमी झाली आहे. वरातीतील धांगडधिंगा थांबला आहे.

हेही वाचा: कोरोना काळातील 'एका लग्नाची गोष्ट!' मास्क लावूनिया वऱ्हाडी जनहो...

वरातीतील धांगडधिंगा थांबला

विवाह सोहळा म्हटला, की मुलीच्या आई-वडिलांसाठी तणावाचा विषय असतो. खर्चाची तोंड मिळविणीपासून मनधरणीपर्यंत शुभमंगल सावधान होऊन मुलगी सासरी जाईपर्यंत त्यांचा जीव सतत टांगणीला लागून राहिलेला असतो. मात्र, आता सोयरिक जुळली की तारीख ठरते. दोन्ही बाजूच्या पंधरा-वीस नातलगांच्या उपस्थितीत दोन तासांत लग्न उरकले जात आहे. वधू-वरांना खासदार-आमदार, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहून शुभेच्छा देण्याची प्रथा वाढली होती. तिलाही आता ब्रेक लागला आहे.

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर

पिंपळगावमध्ये दहा कोटींची उलाढाल थांबली

पिंपळगाव शहरात थाटामाटात विवाह सोहळे व्हायचे. सुमारे १५ लॉन्स व मंगल कार्यालये लग्नतिथींना बुकिंग असतात. यंदाच्या लग्न तिथी पाहता तब्बल दहा कोटी रुपयांची उलाढाल थांबली. त्यामुळे अर्थकारणाला मोठा ब्रेक लागला आहे.

दहा वर्षांपासून मंडप डेकोरेटचा माझा व्यवसाय आहे. लग्नसराईमध्ये आम्हाला फुरसत मिळत नाही. परंतु या वर्षी आम्हाला लग्नाच्या तुरळक ऑर्डर मिळत आहेत.

-रोहित, मंडप डेकोरेटरमालक, पिंपळगाव बसवंत

मुलाचा विवाह धुमधडाक्यात नातलग व मित्रपरिवाराच्या उपस्थित करण्याचा मानस होता. पण, कोरोनाच्या उद्रेकाने मोठी बंधने आली. त्यामुळे अवघ्या पंचवीस व्यक्तींच्या उपस्थितीत नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने विवाह उरकला.

-नारायण झाल्टे, कातरवाडी, ता. चांदवड

loading image