रॉकेल मिळेना आणि गॅस परवडेना; सामान्य गृहिणींना बसतोय फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gas prices

रॉकेल मिळेना आणि गॅस परवडेना; सामान्य गृहिणींना बसतोय फटका

खेडभैरव (जि. नाशिक) : शासनाने रेशनवर मिळणारे रॉकेल बंद केले आहे. तसेच महिलांच्या आरोग्याचा प्रश्न डोळ्यांसमोर ठेवून उज्ज्वला गॅस योजना (Ujjwala Gas Yojana) राबविली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस आहे; पण बंद झालेले रॉकेल व गगनाला भिडलेले गॅसचे दर यामुळे चूल पेटविताना सामान्य कुटुंबातील महिलांच्या डोळ्यांतील पाणी काही आटलेले नाही.

वायुप्रदूषण व वृक्षतोडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने सुमारे तीन वर्षांपूर्वी उज्ज्वला गॅस योजना अमलात आणली. ही गॅस योजना मोफत असल्यामुळे घराघरांत पोचली तथापि वृक्षतोडी व वायूप्रदूषणावर नियंत्रण मिळवता आले. सामान्य गृहिणींना गॅसची सवय लागू राहिली; परंतु तीन वर्षांत या गॅसच्या किमती गगनभरारी घेत सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर झाल्या आहेत. चुलीतील धुरामुळे महिलांच्या डोळ्यांना त्रास होतो, तसेच महिलांच्या आरोग्याच्या समस्यांना आळा घालण्यासाठी उज्ज्वला गॅस योजना अमलात आणली.

या योजनेतून मिळणारे सिलिंडर सुमारे ३५० रुपयांना मिळत होते; पण सध्या गॅसच्या किमती इतक्या वाढल्या आहेत, की तीन वर्षांत तिप्पट म्हणजे सुमारे एक हजार रुपये झाली आहे. सामान्य कुटुंबाला ही किंमत न परवडणारी असून, चूल पेटविण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. रेशनवर मिळणारे रॉकेलही बंद केल्याने आता चूल कशाने पेटवायची, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे

अडगळीतली स्टोव्ह काढले

सरपणासाठी वापरली जाणारी वृक्षतोड थांबली असल्यामुळे सध्या जळाऊ लाकडांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे अडगळीत पडलेले स्टोव्ह काढून महिला डिझेलचा वापर करून स्टोव्ह पेटवू लागल्या आहेत; पण डिझेलची किंमतही परवडण्यासारखी नसल्याने महिला डोक्याला हात लावून बसल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.

टॅग्स :NashikDomestic gas