5G च्या काळात नेटवर्कचा बोजवारा; ग्राहकांना मन:स्ताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mobile network

5G च्या काळात नेटवर्कचा बोजवारा; ग्राहकांना मन:स्ताप

अभोणा (जि. नाशिक) : येथील परिसरात गेल्या आठवड्यापासून बीएसएनएल व इतर खासगी कंपन्यांचे नेटवर्क अत्यंत कमकुवत असल्याने संपर्क व बँक व्यवहाराचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. ग्राहकांना याचा प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

अभोणा ही जुनी व्यापारी बाजारपेठ

स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, नाशिक व कळवण मर्चंट बँक, काही पतसंस्था बीएसएनएल व काही खासगी कंपनीच्या नेटवर्क, इंटरनेट सुविधेने जोडल्या आहेत. परंतु, बऱ्याचवेळा नेटवर्क नसल्याने कनेक्टिव्हिटीच नसते. असलीच तर अतिशय कमी स्पीड असल्याने कोणतेही बँकिंग व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागतो. एटीएममधून पैसेही काढता येत नाहीत. शिवाय कुणाशी संपर्कही साधता येत नाही. गेल्या काही महिन्यांपासून ही सुविधा देणाऱ्या सर्वच कंपन्यांचे रिचार्ज दर प्रचंड प्रमाणात वाढूनही पुरेशी सुविधा मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये असंतोष आहे. सुविधा तर शून्य मात्र आर्थिक फटका सोसावा लागत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने पत्रिकेऐवजी फोनवरच निमंत्रण दिले जाते. परंतु, वारंवार फोन करूनही संपर्क होत नसल्याने आयोजकांचा त्रागा दिसून येत आहे.

अभोणा ही जुनी व्यापारी बाजारपेठ असल्याने सर्व व्यापारीवर्ग, पेट्रोलपंपधारक, कांदा व्यापाऱ्यांना नियमित रोख रकमेचा भरणा करावा लागतो. नेटवर्क, कनेक्टिव्हिटी नसल्याने चेक क्लिअरन्सही होत नाही. पर्यायाने काहीवेळा अतिरिक्त दंड सोसावा लागतो. गुगल- पे, फोन- पेचा आधार असणाऱ्यांचे व्यवहारही क्लिअर होत नसल्याने ग्राहकांच्या खात्यातून पैसे डेबिट होतात. मात्र, समोरच्या पार्टीकडे क्रेडिट होत नसल्याने काहीवेळा वाद होताना दिसतात. खेड्यातून पैसे काढण्यासाठी आलेले ग्राहक दिवसभर रांगेत बसून राहतात. व्यापारी व शेतकऱ्यांना वेळच्यावेळी इतरांची देणी देणे आवश्यक असल्याने आर्थिक व्यवहार वेळीच होणे गरजेचे आहे. पण, नेटवर्क नसल्याने सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे. त्वरित नेटवर्क व इंटरनेट सेवा सुरळीत व्हावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

''नेटवर्क, कनेक्टिव्हिटी नसल्याने आरटीजीएस, एनईएफटी करता येत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांची देणी वेळेवर देता येत नाही. पहिले पेमेंट वेळेवर देता न आल्याने नवीन माल खरेदीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. नेटवर्क, कनेक्टिव्हिटी अभावी शेतकऱ्यांना हवी असलेली खते व औषधे उपलब्ध करून देता येत नाही.'' - विनोद पाटील, ओम साईराम कृषी सेवा केंद्र, अभोणा

टॅग्स :Nashiknetwork5g network