esakal | नाशिक : मंदिरांची कवाडे आजपासून खुली; दर्शनासाठी 'असे' असतील नियम
sakal

बोलून बातमी शोधा

kalaram mandir

मंदिरांची कवाडे आजपासून खुली; दर्शनासाठी 'असे' असतील नियम

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेचे औचित्य साधत तब्बल दीड वर्षापासून बंद असलेली मंदिरांची कवाडे गुरुवारी (ता.७) भाविकांसाठी खुली होत आहे. दरम्यान, लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिरासह कपालेश्‍वराच्या साफसफाईचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान खबरदारी म्हणून सर्वच मंदिरात दहा वर्षाच्या आतील तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना प्रवेश दिला जाणार नाही.


कोरोना उद्रेकामुळे राज्यभरातील देवस्थाने कुलूपबंदच होती. त्यामुळे भाविकांना बंद दाराआडूनच देवदर्शनावर समाधान मानावे लागत होते. मात्र, उद्यापासून (ता. ७) मंदिराची कवाडे उघडत असल्याने भाविकांत उत्साहाचे वातावरण आहे. बुधवारी सकाळपासून श्री काळाराम मंदिरासह कपालेश्‍वर, सांडव्यावरची देवी, सोमेश्‍वर महादेव, बालाजी मंदिर, सीतागुंफा, कैलास मठ आदी भागात स्वच्छतेसाठी लगबग सुरू होती. गत आठवड्यापासून देवस्थानतर्फे त्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. आज अनेक ठिकाणी मंदिर परिसर पाण्याने स्वच्छ करण्यात आला. अनेक देवस्थानातर्फे मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांच्या माळांनी सजावट करण्यात येणार आहेत. देवस्थानात प्रवेश करण्यासाठी सर्वांना मास्क सक्तीचा आहे. एकावेळी गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थानासह पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच मंदिरात जाताना हार, माळ, फुले नेण्यासही मनाई आहे.

हेही वाचा: नाशिक : साडेसात महिन्यांनंतर रम्मी-जिम्मीच्या आवळल्या मुसक्या

बालाजी मंदिरात घटस्थापना

रामकुंड परिसरातील श्री व्यंकटेश्‍वर बालाजी मंदिरात उद्यापासून (ता. ७) नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त मंदिर फुलांच्या सजविण्यात आले असल्याचे महंत कृष्णचरणदास यांनी सांगितले. पहाटे साडेपाच वाजता श्री व्यंकटेश स्तवन, कलशपूजन, श्रींचा अभिषेक व बालभोग, सायंकाळी आरती होईल. शुक्रवारी (ता.८) दुपारी १ ते ४ दरम्यान दासबोधाचे पारायण, शनिवारी व्यकंटेश बालाजी यांच्यासह श्रीदेवीसह रथयात्रा तर सोमवारी (ता. ११) सायंकाळी सात वाजता श्री बालाजीचा विवाह सोहळा पार पडेल.नियम पालन करण्याचे आवाहन

मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली होत असलीतरी कोरोना प्रसाराची भीती अद्यापही कायम असल्याने मंदिरात एकावेळी गर्दी करू नये, सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनासह देवस्थानांनी केले आहे. खबरदारी म्हणून मंदिरात दहा वर्षांच्या आतील मुलांसह ६५ वर्षावरील ज्येष्ठांना प्रवेश दिला जाणार नाही. या नियमांचे सर्व देवस्थानांनी पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा: तरुण पिढीने जाणकारांशी सुसंवाद साधावा! - शरद पवार

loading image
go to top