
Onion Price Fall | हल्ले- प्रतिहल्ले थांबवा, कांदा भावाचं बघा! डॉ. सुधीर जाधव यांची भावनिक साद
येवला (जि. नाशिक) : अहो मुख्यमंत्री महोदय, राजकारण थांबवा, एकमेकांवरचे हल्ले-प्रतिहल्लेही थांबवा.. आणि राज्यात कोसळलेल्या कांद्याच्या भावाने कोलमडलेल्या शेतकऱ्याला वाचवा.. अशी आर्त साद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सुधीर जाधव यांनी घातली आहे.
कांदा पीक घेण्यासाठी गुंतवलेले भांडवलही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याने कांद्याला २ हजार रुपये हमीभाव जाहीर करा व विकलेल्या कांद्याला हजार रुपये अनुदान जाहीर करा अशी मागणी त्यांनी केली आहे. (Dr Sudhir Jadhav Emotional statement regarding Onion Price Fall nashik news)
डॉ. जाधव यांनी जेथे कांद्याला दहा हजार रुपये खर्च केला, तेथे फक्त सात हजार रुपये हातात आले, तेही पाचशे रुपये भाव मिळाले तेव्हा..!आता तर भाव शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत पडल्याने शेतकऱ्यांना शेतात गुंतवलेले भांडवलही मिळत नसल्याने बळीराजाचे हाल पाहवत नाही.
मुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्र्यांची भेट झाली तर हे दुखः त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे डॉ. जाधव यांनी म्हटले आहे. एक ते दोन रुपये किलोने कांदे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने तो वाचणार कसा असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
मुळात कांदा पीक पूर्वी कमी भांडवलात निघत होते, आता कांदा पिकासाठी महागडे औषधे, महागडे रासायनिक खते, महागडी रोपे, वाढती मजुरी हा खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. त्यातच बदलते हवामान, बेमोसमी पाऊस या सगळ्या दुष्परिणामांचा फटका कांद्याला आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
उत्पादन खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे दीड ते दोन हजार रुपये प्रतिक्विंटलला मिळाला तरत कांदा शेतकऱ्यांना परवडेल. उन्हाळ कांद्याने फसवल्यावर लाल व रांगडा कांदा आधार देईल असे वाटत असताना त्यानेही दगा दिल्याने शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे.
आज मिळणाऱ्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसव येत आहेत, ते शिंदे-फडणवीस सरकारने पुसावे असे आवाहन त्यांनी केले आहे. नेतेमंडळीनी एकमेकातील हेवेदावे, हल्ले प्रति-हल्ले, उणे-दुणे काढत आहेत.
मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला कुणालाच वेळ नाही. त्यासाठी कांद्याला एक हजार रुपये अनुदान द्यावे, नाफेड अंतर्गत खरेदी चालू करावी, कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी डॉ. जाधव यांनी केली आहे.