esakal | नाशिक : बससेवेमुळे महामंडळ- महापालिकेत नवा वाद
sakal

बोलून बातमी शोधा

nashik municipal corporation

नाशिक : बससेवेमुळे महामंडळ-महापालिकेत नवा वाद

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाकडून सुरू असलेली शहर बससेवा आर्थिक तोट्यामुळे महापालिकेला चालविण्याचा आग्रह धरणाऱ्या महामंडळाने आता भगूर, निमाणी, नाशिक रोड, सातपूर या स्वमालकीच्या चार बसस्थानकांच्या सामुहिक वापर करण्यास नकार दिल्याने महामंडळ व महापालिकेत नवा वाद निर्माण झाला आहे. वादाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार केली आहे.

आठ जुलैपासून महापालिकेकडून शहर बससेवा सुरू करण्यात आली. त्यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाने महापालिकेकडे शहर बससेवा चालविण्यासाठी आग्रह धरला होता. राज्यात भाजप सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविण्याची जबाबदारी त्या- त्या महापालिकेची असल्याचे कारण देत नाशिक महापालिकेला बससेवा ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाने बससेवा चालविण्यास नकार देत महापालिकेला अल्टिमेटमदेखील दिले होते. महापालिकेने परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केल्यानंतर सेवा सुरू करण्यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कंपनीची स्थापना केली.

आठ जुलैपासून महापालिकेने रीतसर बससेवा सुरू झाली. बससेवा सुरू करताना महापालिकेने पायाभूत सुविधा पुरविण्याचा करार केला, तर बसचे ऑपरेशन, देखभाल व दुरुस्तीसाठी ऑपरेटरची नियुक्ती केली. पायाभूत सुविधा पुरविताना एसटी महामंडळाच्या डेपो वापराची परवानगी महापालिकेला दिली आहे. बससेवा सुरू होऊन तीन महिने झाल्यानंतर एसटी महामंडळाने विरोधाचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने ग्रामीण भागात बससेवा सुरू केल्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर आता एसटी महामंडळाचे डेपो महापालिकेच्या बससेवेसाठी वापरू न देण्याचे धोरण एसटी महामंडळाने स्वीकारल्याचे समोर येत आहे. निमाणी, नाशिक रोड, भगूर व सातपूर बसस्थानकाच्या सामुहिक वापर करण्यास महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीला विरोध दर्शविला जात आहे. सिटीलिंक कंपनीने एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पाचवेळा पत्र पाठविले, परंतु अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार करण्यात आली आहे.

हेही वाचा: नाशिक शहरात दररोज होणार सहा हजार चाचण्या

बस उभ्या करण्यास विरोध

महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीच्या बस एसटी मालकीच्या स्थानकांवर पोचल्यानंतर तेथे बस उभ्या करू दिल्या जात नाही. तसेच, बसस्थानकावर प्रवासी माहिती फलक ध्वनिक्षेपक, डिजिटल माहिती फलक, वेळापत्रक फलक बसविण्याला विरोध केला जात आहे.

हेही वाचा: विरोधकांच्या नातेवाईकांवर छापे टाकणे हा अतिरेक : छगन भुजबळ

loading image
go to top