esakal | शेतकऱ्यांची संरक्षित पाण्यावरच भातलावणी; जोरदार पावसाची प्रतिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

paddy

पावसाअभावी शेतकऱ्यांची संरक्षित पाण्यावरच भातलावणी

sakal_logo
By
विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : ऐन लागवडीच्या काळात दडी मारल्याने तालुक्यातील पूर्व भागातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रूक, तसेच टाकेद परिसरातील धामणगाव, अडसरे, अधरवड, भरविर खुर्द, मायदरा, बांबळेवाडी आदी परिसरात भात लागवड लांबणीवर गेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे भाताचे रोप पिवळे पडल्यामुळे नुकसान होत आहे. त्यातच तालुक्यातील धरणांच्या जलसाठ्यातदेखील पुरेसा साठा नसल्यामुळे विहीर, बोअरवेलचा आधार घेत संरक्षित केलेल्या पाण्यावरच भातलावणी करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. (Due to lack of rains, farmers have to cultivate paddy only on reserved water)


तालुक्यात आत्तापर्यंत अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पावसाअभावी शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिशय कमी जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या भात पिकाची लागवड करण्यास अडथळा निर्माण झाला. रोपांचे नुकसान होत आहे. तालुक्यातील टाकेद, धामणगाव, भरविर, अडसरे सोनोशी, मायदरा आदी असलेल्या डोंगराळ भागातही हीच परिस्थिती आहे. वाडीवऱ्हे, वैतरणा, सांजेगाव, म्हसुर्ली, नागोसली या पश्चिम पट्ट्यात पाऊस असल्याने या भागात भात लागवड अंतिम टप्प्यात आहे. मात्र, पूर्व भागात अद्याप पाऊसच नसल्याने लागवडी सुरू झालेल्या नाहीत.

हेही वाचा: पाणी टंचाई नको तर पाउस आणा; पालकमंत्र्यांचा भाजपला सल्ला


वीज पुरवठ्याचा खोडा

आधीच पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भात लागवडी सुरू आहेत, परंतु वीजपुरवठा उच्च दाबाने होत नसल्याने शेती कामात व्यत्यय येत असल्याने अडचणी कायम आहेत. अनेक वेळा टाकेद भागात सर्रास वीजपुरवठा खंडित होतो आहे, तर विजेचा लपंडाव होतानाचे चित्र असल्याने शेतकऱ्यांसह नागरिक संतप्त होत आहे.जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. भात रोपे तयार असून, केवळ पावसाच्या पाण्याअभावी लागवडी खोळंबल्या आहेत. पावसाअभावी रोपे पिवळी पडत असून, खराब होण्याच्या मार्गावर आहे.
- पांडुरंग वारुंगसे, प्रगतिशील शेतकरी.

(Due to lack of rains, farmers have to cultivate paddy only on reserved water)

हेही वाचा: पक्षांतर्गत डागडुजीसाठी राज ठाकरे नाशिकच्या मैदानात

loading image