दसऱ्याच्या मुहूर्तावर सुवर्ण बाजारात मोठी उलाढाल
(उपशीर्षक)
दर घसरणीमुळे खरेदीदारांना दिलासा; अनेकांची गुंतवणूक म्हणून खरेदी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २० ः साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दसरा सणाला मंगळवारी (ता. २०) सोने खरेदीसाठी सुवर्णनगरीत मोठी गर्दी झाली होती. सकाळपासून सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी झाली होती. सोने व चांदीच्या भावात घसरण झाल्याने अनेकांनी सोने खरेदी केले. यामुळे दिवसभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला.
दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांनी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी केली. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोने व चांदीचे भाव कमी झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याचे भाव यंदा वाढले आहेत. मागील वर्षी सोने एक लाख २० हजार रुपयांपर्यंत होते. ते यंदा एक लाख ४५ हजार रुपयांपर्यंत होते. मागील वर्षाच्या तुलनेत २५ हजारांनी भाव वाढले असले, तरी मंगळवारी सोने खरेदी झाल्याने मोठी उलाढाल झाली. प्रामुख्याने आपट्याची पाने, नेकलेस, मनी, कानातले झुमके खरेदीकडे अधिक कल होता. काहींनी केवळ गुंतवणूक म्हणून सोन्याची चीप खरेदी केली.
इन्फो
सोने १,८००, तर चार हजारांनी स्वस्त
दोन दिवस झाले सोने व चांदीचे भाव कमी झाले होते. सोमवारी (ता. १९) सोने व चांदीच्या भावात काहीशी वाढ झाली. तुलनेत दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने व चांदीचे भावात मोठी घसरण झाली. सोमवारी सोन्याचा भाव एक लाख ४६ हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. त्यात मंगळवारी एक हजार ८०० रुपयांची घसरण होऊन सोने एक लाख ४४ हजार ७०० रुपयापर्यंत खाली आले, तर चांदीच्या भावात तब्बल चार हजार रुपयांची घसरण झाली. चांदीचे भाव दोन लाख १४ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर होते. त्यात चार हजार रुपयांनी कमी होऊन चांदी दोन लाख दहा हजार रुपयांपर्यंत खाली आली.
काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव
तारीख---सोने प्रतिदहा ग्रॅम--- चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी)
१५ ऑक्टोबर---१ लाख ४६ हजार ३००--- २ लाख १३ हजार
१६ ऑक्टोबर---१ लाख ४६ हजार ८००--- २ लाख १५ हजार
१७ ऑक्टोबर---१ लाख ४६ हजार ५००--- २ लाख १२ हजार
१८ ऑक्टोबर---१ लाख ४६ हजार ५००--- २ लाख १२ हजार
१९ ऑक्टोबर---१ लाख ४६ हजार ५००--- २ लाख १४ हजार
२० ऑक्टोबर---१ लाख ४४ हजार ७००--- २ लाख १० हजार