esakal | नाशिक जिल्ह्यात ३५ हजार शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

e-crop survey

नाशिक जिल्ह्यात ३५ हजार शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी नोंद

sakal_logo
By
आण्णासाहेब बोरगुडे

नैताळे (जि. नाशिक) : शेतकऱ्यांनी आपापल्या अँड्रॉइड मोबाईलद्वारे सातबारावर पिकाची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप सुरू करण्यात आले आहे. अनेक लाभ, योजनांसाठी या नोंदी महत्त्वाच्या असल्याने शेतकरी प्रतिसाद देऊ लागले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ३५ हजारावर शेतकरींनी या ॲपवर पीकपाहणीची नोंद केली आहे अशी माहिती तहसीलदार शरद घोरपडे यांनी ‘सकाळ'शी बोलताना दिली.

दरम्यान या ॲपची सर्व्हिस अनेक ठिकाणी डाऊन असल्याने शेतकरी हैराण होत आहेत. ॲपसाठी असलेला सर्व्हर पुरेसा नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सरकारने योजना सुरू करताना याबाबत दक्षता घेतलेली नसल्याचे यातून समोर येत आहे. अनेक ठिकाणी मोबाईल रेंजचाही अडथळा येत आहे.

शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करण्याबाबत महसूल विभागाकडून प्रात्यक्षिक दाखविले जात आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. निफाडचे मंडळ अधिकारी बाळासाहेब निफाडे व तलाठी शंकर खडांगळे यांनी श्रीरामनगर येथे शेतामध्ये जात ई-पीक पाहणी प्रकल्पासंदर्भात मार्गदर्शन केले, मात्र ॲपची सर्विस डाऊन असल्याने उपस्थित शेतकरी निराश झाले. शासनाने ॲपच्या सर्व्हिसमध्ये सुधारणा करून ते तात्काळ कार्यान्वित होण्यासाठी योग्य ती दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तालुक्यातील अन्यत्रही शेतकऱ्यांचा हाच अनुभव आहे.

अँपद्वारे शेतकऱ्यांनी आपल्याकडील अँड्रॉइड मोबाईलमधून आपल्या शेतातील पिकाची सातबाराला नोंद करावयाची आहे, यासाठी महसूल विभागातील मंडळधिकारी, तलाठी, कोतवाल व सर्वच महसूल कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. श्रीरामनगर येथे आज गावातील असंख्य शेतकऱ्यांनी अतिशय उत्सुकतेने ई पीक पाहणी अँप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घेतले, मात्र अँपची सर्विस डाऊन असल्याने शेतकऱ्यांना काहीही माहिती घेता आली नाही. ॲप संदर्भात ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतील, त्यांनी माहितीगार शेतकऱ्यांना व तलाठींना विचारून घ्यावे, कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक शेतकऱ्याला या ॲपद्वारे आपल्या सातबाराला आपल्या शेतातील पिकाची नोंद करावयाची आहे असे आवाहन तलाठी शंकर खडांगळी यांनी केले आहे

हेही वाचा: नाशिक : जिओ मॅपिंगनुसार प्रभागांचे आराखडे तयार करण्यास सुरवात

शेतकऱ्यांनी मोबाईलद्वारे आपल्या सातबारावर पिकाची नोंद ई- पिकपाहणी अँपद्वारे करण्यासाठी महसूल विभागातील कर्मचारी युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत ३५ हजार शेतकऱ्यांनी आपापल्या सातबारावर पिकांची नोंद केली आहे. यासाठी काही अडचणीही येत आहेत, मात्र त्या सोडविण्यासाठी वरिष्ठपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

- शरद घोरपडे, तहसीलदार, निफाड.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोबाईलद्वारे आपल्या शेतातूनच ई- पिक पाहणी अँपद्वारे पिकपेरा नोंदविला पाहिजे, यासाठी शासनाच्या सूचनेनुसार मोहिम राबविली जात आहे. शेतकऱ्यांना अँपची माहिती करून देण्यासाठी सर्वच मंडल अधिकारी तलाठी प्रयत्नशील आहेत.

- बाळासाहेब निफाडे, मंडळ अधिकारी, निफाड.

हेही वाचा: २७ हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना अटक

loading image
go to top