Electricity News: पूर्व भागाचा वीजपुरवठ्याचा प्रश्‍न मिटणार; वावी, पाथरे उपकेंद्रांना शहा केंद्रातून वीजजोडणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL

Electricity News: पूर्व भागाचा वीजपुरवठ्याचा प्रश्‍न मिटणार; वावी, पाथरे उपकेंद्रांना शहा केंद्रातून वीजजोडणी

सिन्नर (जि. नाशिक) : ग्रामीण भागात पक्के रस्ते, शेतीला मुबलक पाणी आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा ही विकासाची त्रिसूत्री घेऊन आपण शेतकऱ्यांसाठी काम करत आहोत. तालुक्याच्या पूर्व भागाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणारे शहा येथील १३२ किलोवॉटचे वीज केंद्र कार्यान्वित झाले आहे.

या केंद्रातून वावी आणि पाथरे येथील उपकेंद्रांना जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावणारा विजेचा प्रश्न निकाली निघणार असल्याची ग्वाही आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली. (Eastern regions power supply problem will solved Power connection to Vavi Pathare sub centres from Shah Centre nashik news)

वावी येथे महावितरण कार्यालयाच्या आवारात वावी ते शहा दरम्यान टाकण्यात येणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीच्या कामाचे भूमिपूजन आमदार कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. माजी सभापती ॲड. राजेंद्र चव्हाणके, माजी गटनेते विजय गडाख, माजी सदस्य रवींद्र पगार,

बाजार समितीचे माजी सभापती रमेश पांगारकर, विनायक तांबे, वावीचे सरपंच संदीपराजे भोसले, माजी सरपंच विजय काटे, कन्हैयालाल भुतडा, प्रशांत कर्पे, विठ्ठलराव उगले, कचरू घोटेकर, सुदेश खुळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार, उपअभियंता अजय सावळे, हर्षल मांडगे आदींसह पूर्व भागातील शेतकरी उपस्थित होते.

आमदारकीच्या गेल्या कार्यकाळात आपण शहा येथील १३२ किलोवॉट क्षमतेचे वीज केंद्र प्रस्तावित केले होते. कोपरगाव आणि कोळपेवाडीच्या नेत्यांच्या सहकार्याने गेल्या महिन्यात हे वीज केंद्र कार्यान्वित झाले. त्याद्वारे सोमठाणे, देवपूर, वडांगळी येथील उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येत आहे.

सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा होत असल्याने या तीन उपकेंद्रांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लवकरच वावी आणि पाथरे येथील उपकेंद्र देखील उच्चदाब वाहिनीद्वारे जोडली जाणार आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

वडांगळी, सोमठाणेप्रमाणेच वावी आणि पाथरेला देखील पुरेशा दाबाने व शेतीसाठी दिवसा किमान आठ तास सुरळीत वीजपुरवठा होईल याकडे आमदार कोकाटे यांनी लक्ष वेधले.

दोघांच्या उपोषणाचे फलित

वावी व पाथरे उपकेंद्रांपर्यंत स्वतंत्र वीज वाहिनी टाकण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी दीड कोटी रुपये निधी जिल्हास्तरीय योजनेतून मंजूर करून दिला आहे. यासाठी वडांगळीचे सरपंच योगेश घोटेकर व दुशिंगवाडीचे सरपंच कानिफनाथ घोटेकर यांना उपोषण करावे लागले होते. या दोघांच्या उपोषणाचे फळ म्हणून वीज वाहिनीचे काम व निधी तातडीने मंजूर झाला असल्याकडे आमदार कोकाटे यांनी लक्ष वेधले.

आडवाडीलाही केंद्र होणार

आगामी काळात मुसळगाव आणि पश्चिम पट्ट्यात आडवाडीला २२० किलोवॉटचे वीज केंद्र प्रस्तावित आहे. येत्या दोन ते तीन वर्षात हे वीज केंद्र कार्यान्वित होईल. याशिवाय रतन इंडियाचा वीज प्रकल्प सुरू झाला तर सिन्नरच्या शेतकऱ्यांना विजेसाठी रडत बसायची वेळच येणार नाही.

आपले इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेले असेल व त्याद्वारे संपूर्ण तालुक्यात सुरळीत आणि योग्य दाबाने वीजपुरवठा सुरू ठेवता येणार असल्याचे आमदार कोकाटे यांनी सांगितले.