esakal | शिर्डीत दिवसभरात आठ हजार भाविक श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक! 
sakal

बोलून बातमी शोधा

shirdi sai.jpg

मंगळवारी दिवसभरात सुमारे तीन हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. याठिकाणी प्रसाद भोजन घेण्‍यासाठी आलेल्‍या प्रथम पाच साईभक्‍तांचे व दुपारी बाराला ‘श्रीं’च्‍या माध्‍यान्‍ह आरतीकरिता प्रथम दहा शिर्डी ग्रामस्‍थांचे व दहा साईभक्‍तांचे पारंपरिक वाद्यांसह पुष्‍पवृष्‍टी करून स्‍वागत करण्‍यात आले.

शिर्डीत दिवसभरात आठ हजार भाविक श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक! 

sakal_logo
By
प्रशांत कोतकर

शिर्डी (नाशिक) : राज्‍य शासनाच्‍या आदेशाने सोमवार (ता. १६)पासून पहाटेच्‍या काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आले. दिवसभरात सुमारे आठ हजार २९० साईभक्‍तांनी सामाजिक अंतराचे पालन करून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला. 

सामाजिक अंतराचे पालनात साईदर्शन 

जगभरात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने १७ मार्चपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. शासन आदेशान्वये १६ नोव्‍हेंबरपासून पाडव्‍याच्‍या मुहूर्तावर धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश झालेत. या आदेशान्वये साईभक्‍तांना श्रींचे दर्शन सुलभरीत्‍या व्‍हावे, तसेच त्‍यांच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने दर्शनरांगेत सॅनिटायझेशन करणे, थर्मल स्क्रीनिंग करणे व दर्शनरांगेत प्रवेश करताना पाय धुण्‍याची व्‍यवस्‍था आदी उपाययोजना संस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात आल्‍या. दर्शनासाठी आलेल्‍या भाविकांना गेट नंबर दोनमधून प्रवेश देऊन द्वारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधून दर्शन घेऊन गुरुस्‍थान मंदिर मार्गे ५ नंबर गेटद्वा‍रे बाहेर जाणे, असा मार्ग उपलब्‍ध करून देण्‍यात आला. लॉकडाउननंतर सुमारे आठ महिन्‍याने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आल्‍यामुळे भक्‍तांच्‍या अतिउत्‍सहामुळे दिवसभरात आठ हजार २९० भक्त श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले. मंदिर व मंदिर परिसरासह दर्शनरांगेत फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली होती. 

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

सुमारे दोन लाख ५० हजार रुपये देणगी प्राप्‍त
मंगळवारी (ता. १७) पहाटे काकड आरतीनंतर साईभक्‍तांना गेट नंबर दोनमधून ‘श्रीं’च्‍या समाधी मंदिरात दर्शनाकरिता प्रवेश देण्‍यात आला. तसेच श्री साई प्रसादालयात साईभक्‍तांकरिता भोजन प्रसाद सुरू करण्‍यात आले. मंगळवारी दिवसभरात सुमारे तीन हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. याठिकाणी प्रसाद भोजन घेण्‍यासाठी आलेल्‍या प्रथम पाच साईभक्‍तांचे व दुपारी बाराला ‘श्रीं’च्‍या माध्‍यान्‍ह आरतीकरिता प्रथम दहा शिर्डी ग्रामस्‍थांचे व दहा साईभक्‍तांचे पारंपरिक वाद्यांसह पुष्‍पवृष्‍टी करून स्‍वागत करण्‍यात आले. साईभक्ता‍ंद्वारे देणगी कार्यालयात सुमारे दोन लाख ५० हजार रुपये देणगी प्राप्‍त झाली. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करताना यशस्‍वीपणे नियोजन करण्‍यासाठी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागप्रमुख व कर्मचारी हे प्रयत्‍नशील आहेत.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला

loading image