बॅकलॉग भरणारे अख्खे वर्षच इलेक्शन फीव्हरचे!  स्थानिक नेत्यांचा लागणार कस, लाभणार नवे चेहरे 

election123.jpg
election123.jpg

येवला (जि.नाशिक) : येणाऱ्या २०२१ या अख्ख्या वर्षात जिल्हाभर इलेक्शनचा फीव्हर अनुभवावयास मिळणार आहे. जिल्हा बँक, तालुका व्यापारी बँका, ग्रामपंचायती, पालिका, बाजार समित्या आदी सर्वच महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुका या वर्षात होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण वर्ष गावकीच्या भावकीचे, गटबाजीचे अन्‌ आचारसंहितेतच जाणार हे स्पष्ट आहे. 

दुसरीकडे संपूर्ण वर्षभर आचारसंहितेचा फटका विकासकामांना
खरंतर २०२० मध्ये जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. मात्र, कोरोनाने संपूर्ण वर्ष वाया घालवले. आता दोन्ही वर्षांतील मुदत संपलेल्या संस्थांच्या निवडणुका २०२१ मध्येच होणार असल्याने निवडणुकांचा बॅकलॉग जणू या वर्षात भरला जाईल. त्यामुळे गेल्या वर्षभरात बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक पातळीवरील नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये वर्षानुवर्षे एकमेकांच्या समोरासमोर उभे ठाकणारे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आल्याने तालुक्याच्या राजकारणाचे चित्र कसे असेल, हे येणारा काळच ठरवेल. शिवाय अनेक ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची शक्यता असल्याने भाजपला मात्र सत्तेसाठी मोठा संघर्ष करावा लागू शकतो. दुसरीकडे संपूर्ण वर्षभर आचारसंहितेचा फटका विकासकामांना बसू शकेल. 

गावोगावी राजकारण तापले 
सध्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या बुधवारपासून (ता. २३) उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरवात होईल. त्यामुळे ५० पेक्षा जास्त प्रमुख गावांसह ६२१ ग्रामपंचायतींचे वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. त्यातच नाशिक व मालेगाव महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच फिल्डिंग लावली जात आहे. शिवाय, तत्पूर्वी नगरपंचायती व पालिकांची तालीमही चांगलीच रंगणार आहे. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या कळवण, देवळा, निफाड, पेठ, सुरगाणा या नगरपंचायतींसह चांदवड नगर परिषदेची प्रभागरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ठिकाणी पॅनलनिर्मितीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. तसेच भगूर, सटाणा, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड या मोठ्या सहा पालिकांची मुदत डिसेंबर २०२१मध्ये संपणार असल्याने तेथे नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊ शकतात. त्यासाठीची तयारी आतापासूनच वॉर्डावार्डात सुरू झाली आहे. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

जिल्हा बँकेकडे लक्ष 
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधणाऱ्या जिल्हा बँकेची निवडणूकही नव्या वर्षात रंगेल. येथे वर्णी लागण्यासाठी बड्या हस्ती आतापासूनच तयारीला लागल्या आहेत. मुदत संपल्याने व सहकार विभागाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली असल्याने बँकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. अशीच परिस्थिती देवळाली, देवळा, येवला मर्चंट बँकेचीही आहे. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

बाजार समितीत स्थानिक नेत्यांचा कस 
जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांचा फड लवकरच रंगताना दिसेल. शुक्रवारी (ता. १८) घोटी-इगतपुरी व येवला बाजार समितीच्या संचालकांची मुदत संपल्याने प्रशासकाची नेमणूक झाली आहे. इतर बाजार समित्यांनाही हा फॉर्म्युला लागू शकतो. सध्या नाशिक, नांदगाव, कळवण, येवला, चांदवड, पिंपळगाव बसवंत व सिन्नर या बाजार समित्यांची मुदत संपलेली असून, मार्चमध्ये मुदत संपणाऱ्या मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकांना फेब्रुवारी-मार्चचा मुहूर्त मिळू शकतो. लासलगाव बाजार समितीचा फड मात्र एप्रिल-मेमध्ये रंगताना दिसेल. 

अशी संपेल संस्थांची मुदत 
* जिल्हा बँक- जून २०२० 
बाजार समित्या 
* नाशिक, नांदगाव, येवला- १९ ऑगस्ट २०२० 
* कळवण- २८ ऑगस्ट २०२० 
* चांदवड- १६ ऑगस्ट २०२० 
* पिंपळगाव बसवंत- २ ऑगस्ट २०२० 
* सिन्नर- २० ऑगस्ट २०२० 
* लासलगाव- मे २०२१ 
* मालेगाव- मार्च २०२१ 

*पालिका / नगरपंचायत 
* कळवण, देवळा, निफाड, पेठ, सुरगाणा, चांदवड- डिसेंबर २०२० 
* येवला, भगूर, सटाणा, सिन्नर, नांदगाव, मनमाड- डिसेंबर २०२१ 
* नाशिक महापालिका- मार्च २०२२ 
* मालेगाव महापालिका- जून २०२२  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com