लोंबकळणाऱ्या वीजतारांमुळे शेतकऱ्यांचे जीव टांगणीला | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farming

लोंबकळणाऱ्या वीजतारांमुळे शेतकऱ्यांचे जीव टांगणीला

sakal_logo
By
प्रकाश बिरारी

कंधाणे (जि. नाशिक) : महावितरण कंपनीची शेतपंपासाठी वीजपुरवठा करणारी जुनाट वीजवितरण व्यवस्था मोडकळीस निघाली आहे. अनेक ठिकाणी वाकलेले खांब व वीजवाहक तारा जीर्ण झाल्याने लोंबकळलेल्या तारा धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे यंत्रणेत वारंवार बिघाड व सातत्याने वीजपुरवठा खंडित होतो. मात्र, महावितरणकडून तत्काळ दुरुस्ती होत नसल्याने पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून दुरुस्तीची कामे करावी लागत आहे.

शेती ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. देशाची अन्नसुरक्षा शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. मात्र, कधी दुष्काळ, गारपीट व अवकाळीसारख्या नैसर्गिक आपत्तींना तर कधी वीज बिल थकल्यावर वीजपुरवठा खंडित होणे अशी सुल्तानी संकट ओढवल्याने शेती व शेतकऱ्यांची दारुण परिस्थिती हा गेल्या काही दशकांपासून राष्ट्रीय पातळीवरील एक चिंतेचा विषय बनला आहे. शेतीसाठी महावितरणकडून लोडशेडींगनुसार दिवसा केवळ आठ व रात्री दहा तास वीज पुरवली जाते. शिवाय विविध तांत्रिक बिघाडामुळे निर्धारित कालावधीत होणारा वीजपुरवठा अत्यंत व्यत्ययकारी व अनियमितपणे म्हणजे तास-दोन तासात वीज गायब होत असते. अशा परिस्थितीत पिकांना रात्रीच्या वेळी पाणी देताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येतात. बहुतांश ठिकाणी महावितरणच्या जुनाट ट्रान्सफॉर्मर, कंडक्टर्स, फ्यूज, कीट या साहित्याची वाईट अवस्था झाली आहे.

हेही वाचा: आरोग्यवर्धक कवठाची झाडे बहरली; नागरीकांना भुरळ

शेतकऱ्यांना आपल्या पिकांना वेळेवर पाणी देऊन वाचविण्याच्या धडपडीत नाईलाजास्तव आवश्यकतेनुसार छोट्या - मोठ्या साहित्यावरचा खर्च वर्गणी गोळा करून करावा लागतो. ट्रान्सफॉर्मरची किरकोळ देखभाल दुरुस्ती, केबल बदलणे, एकमेकांना चिकटणाऱ्या लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारांना बांबूच्या काठ्या बांधून सुरक्षित अंतरावर बांधणे, फ्यूज टाकणे आदी कामे करावी लागतात. प्रसंगी आवाक्याबाहेर असणारी कामे खासगी तंत्रज्ज्ञ किंवा महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन करून घ्यावी लागतात. अशा अडचणींच्या दुष्टचक्रातून जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांची सुटका कधी थांबेल, या आशेवर बळीराजा जगत आहे.

''चार दशकांपेक्षा अधिक काळातील वितरण व्यवस्थेतील खांब वादळ वाऱ्यामुळे दिशाहीन अवस्थेत आहेत. दोन खांबांमधील अंतर जास्त असल्याने व कालांतराने जीर्ण झालेल्या तारांवर पक्षी समूहाने बसल्याने तारांच्या घर्षणामुळे उसासारखे पीक जळण्याच्या घटना घडल्या आहेत. सदर साहित्य बदलण्याची गरज आहे.'' - प्रमोद बिरारी, प्रगतिशील शेतकरी, कंधाणे

हेही वाचा: अनारक्षित पँसेजर गाड्या उद्यापासून रूळावर! प्रवाशांना दिलासा

loading image
go to top