
Employees Strike : सिव्हिलच्या संपकरी कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावणार
नाशिक : जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याबाबत नोटीस देणार आहेत.
कामावर हजर न झाल्यास आंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाण्याची शक्यता आहेत. (Employees Strike Distric Surgeon will issue notices to civil hospital employees nashik news)
जिल्हा रुग्णालयातील संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे प्रसूतीसह इतर गंभीर आजारांच्या रुग्णांवर आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज व घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत.
त्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून दोन्ही रुग्णालयांना पत्रव्यवहार केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. बेमुदत संपावर कर्मचारी असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यावर ताण आला आहे.
जिल्हा रुग्णालयातील ८९१ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. संपाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.१५) जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय कामकाज कंत्राटी कर्मचाऱ्यांना करावे लागले. जिल्हा रुग्णालयात ९२३ कंत्राटी कर्मचाऱ्यांना ८ तासांऐवजी १२ तास कामकाज करावे लागत आहे.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
यामध्ये २६२ डॉक्टर, ६६१ कर्मचारी व ३८९ कंत्राटी परिचारिका आहेत. दोन दिवसांत १३४ जणांवर गंभीर आजाराच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तीन दिवसांत १२ हून अधिक नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ओपीडीमध्ये कर्मचारी नसल्याने शेकडो रुग्णांचे हाल झाले.
शासकीय कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी गोल्फ क्लब, शालिमार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅलीत जिल्हा रुग्णालयातील संपावरील कर्मचारी सहभागी झाले होते. संपामध्ये जिल्हा नर्सेस असोसिएशनही सहभागी झाली होती.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा सुरू होती. कायम कर्मचारी संपात सहभागी झाल्याने रुग्णसेवेची भिस्त एनआरएचएम अंतर्गत नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. शिवाय नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचीही रुग्णसेवेसाठी मदत घेण्यात येत आहे.