esakal | संसारासाठी मांडणीचा आहेर हमखास! मालेगावात पाचशेवर कुटुंबांना रोजगार 
sakal

बोलून बातमी शोधा

mandani.jpg

शहरातील संसारोपयोगी साहित्य ठेवण्यासाठी साकार होणारी मांडणी (रॅक) प्रसिद्ध आहे. येथील पूर्व भागातील कुशल कारागिरांकडून तयार होणाऱ्या लोखंडी मांडणीला सर्वदूर मागणी आहे. पूर्वेकडे मुस्लिम बांधव प्रत्येक मुलीला संसार थाटण्यासाठी मांडणीचा आहेर हमखास देतात.

संसारासाठी मांडणीचा आहेर हमखास! मालेगावात पाचशेवर कुटुंबांना रोजगार 

sakal_logo
By
जलील शेख

मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील संसारोपयोगी साहित्य ठेवण्यासाठी साकार होणारी मांडणी (रॅक) प्रसिद्ध आहे. येथील पूर्व भागातील कुशल कारागिरांकडून तयार होणाऱ्या लोखंडी मांडणीला सर्वदूर मागणी आहे. पूर्वेकडे मुस्लिम बांधव प्रत्येक मुलीला संसार थाटण्यासाठी मांडणीचा आहेर हमखास देतात. ही मांडणी स्टील मांडणीपेक्षा टिकाऊ, मजबूत व स्वस्त असल्याने येथील नागरिक शहरात तयार होणाऱ्या मांडणीला पसंती देतात. मांडणी निर्मितीतून रोजगाराला हातभार लागला असून, शहरातील दहा कारखान्यांतून दरमहा सुमारे २० हजार, तर विविध वेल्डिंग शॉपमध्ये दोन ते तीन हजार मांडण्या तयार होतात. 

लॉकडाऊनचा व्यवसायावरही परिणाम
शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही आदिवासी बांधवांकडून या मांडणीला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. कोरोना संसर्गातील लॉकडाउनची झळ या व्यवसायालाही बसली. लॉकडाउनमुळे लग्ने पहिल्यासारखी होत नाहीत. त्यामुळे या व्यवसायावरही परिणाम झाला. शहरात महिन्याला २० हजार मांडण्या तयार होतात. येथे १९८७ पासून मांडणी बनविण्यास सुरवात झाली. प्रारंभी दोन ते तीन कारखाने होते. शहरात सध्या दहा कारखाने सुरू आहेत. मांडणी तयार करण्यासाठी पंजाबहून लोखंडी बार आणले जातात. सिकंदराबाद येथून चेन जाळी, तर सिन्नर औद्योगिक वसाहतीतून बारीक जाळी हा कच्चा माल मागविण्यात येतो. विविध कारखान्यांतील कुशल कारागीर मांडणी तयार करतात. प्रामुख्याने प्रत्येक घरात स्टील व लोखंडी मांडणी भांडे लावण्यासाठी वापरली जाते. 

हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न 

मालेगावात पाचशेवर कुटुंबांना रोजगार 
शहरातील व परिसरातील प्रत्येक लग्नामध्ये मांडणी ही भेट दिली जाते. या मांडणीला शहरात ३० टक्के मागणी आहे. नाशिक, देवळा, कळवण, हरसूल, औरंगाबाद, सेंधवा, ब्यारा (गुजरात), जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी आदी भागात मांडणीला मागणी जास्त आहे. या व्यवसायातून पाचशेपेक्षा अधिक कुटुंबांना व असंख्य विक्रेत्यांना रोजगार मिळाला आहे. एक कारागीर दिवसाला पाच ते सात मांडण्या तयार करतो. मांडणी बनविण्यासाठी कारागिरास मजुरी म्हणून ९० रुपये दिले जातात. 

दिवसेंदिवस मागणीत वाढ 
स्टीलच्या मांडणीपेक्षा लोखंडी मांडणी टिकाऊ व मजबूत असते. या मांडणीचे वजन १२ ते १८ किलोपर्यंत असून, अधिक काळ मांडणी टिकते. त्यामुळे या मांडणीला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. एक मांडणी तयार होण्यास दोन तास लागतात. 

हेही वाचा >> एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा

लग्नसराईच्या आठ महिन्यांपूर्वी मांडणी तयार करून ठेवतो. लग्नसराईत मांडणीची मागणी वाढल्यामुळे माल (मांडणी) शिल्लक राहत नाही. कोरोना दुसऱ्या लाटेची चर्चा असल्याने सध्या मोठ्या प्रमाणावर माल तयार करता येत नाही. -साजिद शाह, संचालक, शाह वेल्डिंग अॅन्ड फर्निचर, मालेगाव 

loading image
go to top