Latest Crime News | एक्स- बॉयफ्रेंडकडून युवतीचे अपहरण करून अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape News

Nashik Crime News : एक्स- बॉयफ्रेंडकडून युवतीचे अपहरण करून अत्याचार

नाशिक : दिवाळी सुटीनिमित्त गावी जाण्यासाठी महामार्ग बसस्थानक येथे आलेल्या नर्सिंगच्या विद्यार्थिनीला तिच्याच एक्स- बॉयफ्रेंडने बळजबरीने दुचाकीवर बसविले आणि जव्हार, पालघरच्या जंगलात नेत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पालघरच्या मनोर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा नाशिकच्या मुंबई नाका पोलिसात वर्ग करण्यात येऊन अपहरण, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही ठाण्याचे पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.

हेही वाचा: Nashik : झाडाला गळफास घेत युवकाची आत्महत्त्या

योगेश भुयाळ (२०, रा. सोनावे, ता. जि. पालघर) असे संशयिताचे नाव आहे. पालघर जिल्ह्यातील १८ वर्षीय विद्यार्थिनी एका नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेते. दिवाळी सुटीत विद्यार्थिंनी ही १९ ऑक्टोबरला सकाळी महामार्ग बसस्थानक येथे आली. तिला पालघर येथे जायचे असल्याचे तिच्या दुसऱ्या मित्रासमवेत ती बसची प्रतिक्षा करीत थांबली होती. त्या वेळी तिचा एक्स-बॉयफ्रेंड योगेश भुयाळ दुचाकीवर आला.

संशयित योगेशने तिच्यासमवेत असलेल्या युवकाला धमकावले आणि तिला बळजबरीने दुचाकीवर बसविले. त्यानंतर तो दुचाकीने त्र्यंबक रोडने जव्हार, पालघरच्या दिशेने निघाला. वाटेत त्याने जव्हार- पालघरच्या जंगलात थांबवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्या डोक्याला दगड मारून जखमी करून पसार झाला. पीडितेने पालघरच्या मनोर पोलिस ठाण्यात धाव घेत आपबिती सांगितली. त्यानुसार, संशयित योगेश भुयाळ विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, सदर घटनेत पीडितेचे अपहरण नाशिकच्या महामार्ग बसस्थानकातून झाल्याने याप्रकरणी मनोर पोलिसांकडून सदरचा गुन्हा मुंबई नाका पोलिस ठाण्यात वर्ग केला. त्यानुसार, अपहरण, बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, मुंबई नाका व मनोर पोलिस संशयित योगेशचा शोध घेत आहेत. तपास सहाय्यक निरीक्षक साजिद मन्सूरी हे करीत आहेत.

हेही वाचा: Nashik : दुचाकीच्या धडकेत वृद्धा ठार