
Nashik : राज ठाकरेंनी पोलिसांना लावले नमाजला !
जुने नाशिक : भोंगा आंदोलनामुळे (Bhonga Controversy) शहराच्या विविध मशिदी बाहेर पोलिस विभागाकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतकेच नाही तर पाचही वेळच्या नमाज आणि अजानची माहिती बिनतारी संदेश यांच्यामार्फत घेतली जात आहे. त्यानिमित्ताने पोलिस कर्मचाऱ्यांना अजान झाली की, मशिदीकडे वळावे लागत आहे. जणू मुस्लिम बांधवांप्रमाणे तेदेखील अजानचा आवाज ऐकताच नमाज करण्यास जात आहे की काय, अशा प्रकारचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. (Extra security from police outside the mosque Due to Bhonga Controversy)
मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी मनसेतर्फे नाना विविध प्रकार केले जात आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस विभागाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. मशिदी बाहेर पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. यावर न थांबता मशिदीमध्ये पाच वेळ होणाऱ्या नमाजची संपूर्ण माहिती पोलिस मुख्यालयाकडून बिनतारी संदेश तसेच लेखी स्वरूपात घेतली जात आहे. अजान किती वाजता झाली, त्यानंतर नमाज किती वेळ चालली, नमाजासाठी किती मुस्लिम बांधव उपस्थित होते, अशी विविध प्रकारची माहिती घेतली जात आहे. पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागातील कर्मचारी तसेच अन्य नियुक्त कर्मचारी अजान सुरू होताच मशिदीच्या दिशेने जाताना दिसत.
हेही वाचा: Nashik : पाण्याच्या मागणीत वाढ; मनपाकडून 10 टँकरची सोय
इतर वेळी अजान झाली की, मुस्लिम बांधव नमाजला जात असल्याचे चित्र बघावयास मिळत होते. दोन दिवसापासून मात्र मुस्लिम बांधवांसह पोलिसदेखील नमाजाच्या दिशेने जातानाचे चित्र दिसत आहे. जणू मुस्लिम बांधवांबरोबर तेदेखील नमाजाच्या वेळेस नित्यनियमाने मशिदीकडे जात असल्याने पोलिसदेखील नमाजला निघाले की काय असा भास झाला नाही तर नवलच. याशिवाय पोलिस विभागाचे काही अन्य विभागातील साध्या गणवेशातील मुस्लिम पोलिस कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी अन्य मुस्लिम बांधवांसह नमाजपठण करताना दिसून येत आहे. कामानिमित्त इतर वेळेस त्यांना नमाज पडणे शक्य होत नव्हते. परंतु भोंगा आंदोलनामुळे त्यांना पाचही वेळची नमाजपठण करता येत आहे.
हेही वाचा: शेतकऱ्यावर डिझेल टाकून जाळले; 13 जणांवर गुन्हा दाखल
Web Title: Extra Security From Police Outside The Mosque Due To Bhonga Controversy Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..