
इंदिरानगर (जि. नाशिक) : पाथर्डी फाटा येथील मुरलीधरनगरच्या भाजीबाजारात आज काही शेतकरी आणि तेथे व्यवसाय करणाऱ्यांमध्ये बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसन शेतमालाची फेकाफेक झाली. याबाबत येथे अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान येथे महापालिकेतर्फे ११० ओटे बांधण्यात आले आहेत. त्यातील काही जागा शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आली आहे. मात्र अनेक शेतकरी आपला माल रस्त्यावर स्वस्तात विक्री करतात, त्यामुळे ओट्यावर असलेल्या विक्रेत्यांचा व्यवसाय होत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. ग्राहक दोन पैसे कमी मिळत असलेल्या या भाजीपाल्याला पसंती देतात. त्यामुळे हा माल हातोहात विकला जात होता. व्यावसायिक मात्र ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते, ही खदखद अनेक दिवसांपासून सुरू होती.
याच मुद्द्यावरून आज शेतकरी आणि व्यावसायिकांमध्ये बाचाबाची झाली. येथे येणारे हे शेतकरी नसून इतर ठिकाणाहून माल भरतात आणि येथे आणून विकतात असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे, मात्र अनेक ग्राहकांनी हे शेतकरीच असून थोडाफार माल घेऊन विकून येथून निघून जातात असे सांगितले.
याबाबत सर्व भाजीविक्रेते रविवारी (ता.८) विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांची भेट घेणार असून शेतकऱ्यांना नेमून दिलेल्या जागेत शेतकऱ्यांना बसवण्यात यावे आणि रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी करणार आहेत.