वाहनाविना शेतमजूर येईना; शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड | Agriculture news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture

वाहनाविना शेतमजूर येईना; शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड

खामखेडा (जि. नाशिक) : कसमादे परिसरात सध्या रब्बी हंगामातील उन्हाळ कांदालागवड सुरू आहे. शेतीकामांना (Agriculture work) मजुरांची गरज भासत असल्यामुळे मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. रोजंदारीने कामे करण्यापेक्षा ठेका पद्धतीने सर्वाधिक कामे केली जात आहेत. कामे लवकर आटोपण्यासाठी मजुरांना शेतात ने-आण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून महागड्या वाहनांचा वापर केला जात आहे.

वाहनाविना मजूर येईना

यंदा चांगला पाऊस झाला. रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या. शेतकरी कांदालागवडीत व्यस्त आहेत. शेती कामांसाठी मजूर गावात उपलब्ध होत नाही. मजूर बाहेरगावाहून आणावी लागतात. मजूर शेतात पायी येण्यास धजावत नाही. मजुरांना सध्या २५० ते ३०० रुपये प्रतिदन, घेण्यासाठी व पोचविण्यासाठी वाहनाची व्यवस्था शेतकऱ्यांना करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा या वर्षी लागवडीवरच अधिक खर्च करावा लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
मजुरांची ने- आन करण्यासाठी पूर्वी शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करीत असे. या वाहनातून वेळ होत असे. मात्र, या वर्षी सध्या टेम्पो, ट्रॅक्स, आयशर, पिकअप, इंडिका बोलेरो, अपे रिक्षांचा शेतकरी वापर करू लागला आहे. मजूरही वाहन नसले, तर कामास येत नाही. वाहने नसलेले शेतकरी भाड्याने वाहने लावून घेत आहेत. त्याची झळ शेतकऱ्याला बसत आहे.

''दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मजूर उपलब्ध होत. या वर्षी सगळीकडे पाऊस झाल्याने शेतकरी रब्बी पिकांच्या लागवडीत गुंतला आहे. जास्तीची मजुरी देत शेतकरी काम उरकून घेत आहेत.'' - संदीप मोरे, शेतकरी, खामखेडा